धवलसिंह यांचा राजीनामा पत्थ्यावर, हसापुरेंना संधी
सुशीलकुमार व खा.प्रणितीताई यांचीही पसंती

(विजयकुमार पिसे)
करमाळ्यात बिबट्याचा बंदुकीने अचूक वेध घेतल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी लागलेले अकलूजचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी शिंदे परिवारालाच लक्ष्य करून गेल्या आठवड्यात पदाचा राजीनामा दिला. पण त्यांचा राजीनामा पत्थ्यावर पडला असून काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ठोस भूमिका पार पाडलेले सुरेश हसापुरे यांना संधी अटळ आहे. विशेष म्हणजे शिंदे परिवाराचीही त्यांना पसंती आहे.
दरम्यान शिंदे परिवाराची काँग्रेस अशीच ओळख राहिली तर भविष्यात पक्षाची अवस्था शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे होईल. याकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे लक्ष वेधून घेत धवलसिंह यांनी नाना पटोले माळशिरस दौर्यावर आले असता त्यांना भेटून राजीनामा सादर केला होता. त्यांचा राजीनामा पक्षाच्या पत्थ्यावर पडणार असून सुंठीवाचून खोकला गेला, अशी भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पदावर शिंदे समर्थक सुरेश हसापुरे यांची वर्णी लागेल, अशीही चर्चा असून अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील पुन्हा सक्रिय झाले. आणि यावेळी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. याचे खापर त्यांनी सुशीलकुमार आणि खा.प्रणितीताई यांच्यावरच फोडले. त्यांच्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. तो आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सहा पानी पत्रातून स्पष्ट केले होते.
धवलसिंह मोहिते पाटील अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द प्रभावी ठरली नाही. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी जबाबदारीने सोलापूर लोकसभा निवडणूक यंत्रणा हाताळली. ज्यामुळे प्रणितीताई विजयी झाल्या. दहा वर्षात काँग्रेसचा दोन वेळा झालेला पराजय पुसून टाकला. ही वस्तुस्थिती पाहता धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षाच्या रिक्त पदावर सुरेश हसापुरे यांची वर्णी लागू शकेल. हसापुरे हे शिंदे परिवाराचे विश्वासू अशी ओळख आहे.
दरम्यान जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाचे प्रवक्ते व प्रसिध्दी प्रमुख म्हणून गत दहा वर्षाांपासून कार्यरत सातलिंग शटगार हे देखील इच्छुक आहेत. शटगार व्यक्तिनिष्ठ नसून पक्षनिष्ठ आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष बदलला तरी शटगार त्या पदावर कार्यरत होते. अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी आता त्यांची वर्णी लागू शकते. शंकर म्हेत्रे यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिल्यामुळे येथील पद रिक्त झाले आहे.
What's Your Reaction?






