IAS TUKARAM MUNDHE : तुकाराम मुंढेंच्या मुलाने पाचवीपर्यंत ६ शाळा बदलल्या!

मुलगा दोन प्रश्‍न विचारतो, तुमच्या बरोबर यायचं आहे का? की शाळा बदलणार? शाळेत त्याला मित्रच नाहीत... कारण..? २१ वर्षांत मुंढे यांच्या २२ बदल्या..

Jul 12, 2026 - 10:57
 0  16
IAS TUKARAM MUNDHE : तुकाराम मुंढेंच्या मुलाने पाचवीपर्यंत ६ शाळा बदलल्या!

(विजयकुमार पिसे)
   संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे... नाठाळाच्या माथी हाणू काठी... या न्यायाने हाती दंडुका घेऊन अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रवासीयांचे आरोग्य (खान,पान,औषधं) जपण्याचे काम (तडीस नेण्याचा प्रयत्न) करीत आहेत. शनिवारी त्यांनी तब्बल २.४५कोटींच्या औषधांवर टांच लावली आहे. असा हा खमक्या अधिकारी. अशा बापाचं  मन हळवं असतंच. आपल्या मुलाबद्दल खंत व्यक्त करताना धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे त्यांच्या मुलाने पाचवीपर्यंत ६शाळा बदलल्यात. शिवाय शाळेत त्याला मित्रच नाहीत. कारण..!
   अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यापासून  मुंढे यांनी गुटखा माफीया, खाद्यपदार्थ, दूध, थंड पेये यामधील भेेसळखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. "नाठाळाच्या माथी काठी.." हाणणारे तुकाराम मुंढे खमके अधिकारी असले तरी त्यांच्या खमकेपणाचा कुटुंबावर परिणाम होतो. जेथे जातात, तेथे बेधडक कामगिरी. आता कुटुंबाच्या बाबतीतही .."जेथे जातो, तिथे आम्ही सांगाती। चालविसी हात धरोनिया.." याप्रमाणे माझ्या कुटुंबाने मला सपोर्ट केलेला आहे, असे मुंढे म्हणतात. 
     याविषयी भाष्य करताना ते म्हणाले. आपण सातत्याने कामाचाच विचार करतो. असं असलं तरी कुटुंबाची सुद्धा जबाबदारी आहे. सातत्याने बदल्यांमुळे कुटुंबावर परिणाम नक्की होतो. मुलाच्या अनेक शाळा बदलाव्या लागल्या. त्यामुळे त्याचे मित्र झाले नाहीत. हा परिणाम नक्की झाला आहेे. माझ्यामुळे कुटुंबाला हा त्रास सहन करावा लागतो. पण एक जनतेचा सेवक म्हणून मी या गोष्टींचा बाऊ करत नाही. पण कुठेना कुठे त्याची खंत नक्की असते. 
   मुलाच्या पाचवीपर्यंत सहा शाळ्या बदलल्या. कारण दरवर्षी शाळा बदलायची. सुरुवात मुंबईपासून झाली, पुढे सोलापूर, मग नवी मुंबई, पुणे, नाशिक, परत मुंबई असा प्रवास त्याला करावा लागला. एका ठिकाणी एका वर्षापेक्षा जास्त काळ (शाळेत) त्याला मिळाला नाही. त्यामुळे मित्र परिवारही कधी करता आला नाही. त्यामुळे माझे(मुलाचे) मित्र नाहीत, अशी खंत त्याची होती. ज्यावेळी माझी बदली होते, तेव्हा त्याचा पहिला प्रश्‍न असा असतो की, "आता तुमच्याबरोबर मला यायचं आहे का? परत माझी शाळा बदलायची आहे का?" अशा वेळी ती कठीण परिस्थिती असते. 
   ..पण त्याला सामोरं जावं लागतं. कारण तुम्ही एक पब्लिक सर्व्हंट म्हणून भूमिका घेतलेली आहे, तो रोल तडीस न्यायचा असेल तर ते माझं दायित्व आहे, अशी भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow