हा "उत्तम" स्टंट...पण
हा "उत्तम" स्टंट...पण

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांचे कट्टर हाडवैरी म्हणून वेळापूरच्या जानकरांची "उत्तम" ओळख. त्यामुळे निवडणुकीत त्यांची धोबीपछाड ठरलेली. यावेळी मात्र त्यांच्यावर मोहिते पाटलांची कृपादृष्टी. तरीही जेमतेत मतांच्या फरकाने जिंकून आले. आमदारकी जिंकली याचा आनंद साजरा करण्याऐवजी मारकडवाडीवरून त्यांनी स्वत:ची आमदारकी पणाला लावली आहे. आणि टोकाची भूमिका घेतली तर शरद पवार गटाची भलतीच पंचायत. म्हणून जयंत पाटलांनी त्यांना सल्ला दिलाय, मला विचारून राजीनामा द्या. अन्यथा. शरद पवार गटाकडे फक्त "नवरत्नच" शिल्लक राहायचे. तुतारीचे फक्त दहा आमदार निवडून आले आहेत. म्हणून ही काळजी.
मारकडवाडी जानकरांचे हक्काचे गाव. नेहमीच त्यांच्या पाठिशी असलेल्या गावात यंदा अशी काय जादू झाली की तिथे पराभूत उमेदवार राम सातपुते यांना १६० मताधिक्य मिळाले. पाच वर्षापूर्वीची विधानसभा निवडणूक सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या कृपेने जिंकली तरी या पाच वर्षात विकासकामे आणि प्रचंड जनसंपर्काच्या माध्यमातून सातपुते यांनी आपले स्वत:चा (बीडचे पार्सल असूनही) ब्रॅण्ड निर्माण केला आहे. या गावात सातपुते यांनी २१.८९ कोटींची विकास कामे केली आहेत. आणि आरोग्य दूत ही प्रतिमा जमेची बाजू. त्यामुळे पहिल्यांदा आमदारकी जिंकताना जानकरांची दमछाक झाली. तसेच सातपुतेंच्या बदल्यात मोहिते पाटलांना भाजपाने भरभरून दिले. रणजितसिंह यांना मागल्या दाराने आमदार केले. आता रणजीतदादांना बारामतीचा घरोबा करायचा आहे की जानकरांची कोंडी करायची आहे. हे न उलगडणारे कोडे असून जानकरांची रडकथा उत्तम असली तरी कदाचित ती अंगलट आली तर. हाती..... आले अशी अवस्था नको व्हायला.
जानकरांना दु:ख आहे, निसटत्या मतांनी मिळालेला विजय. आणि मारकडवाडीत झालेली पिछेहाट. पण त्यांची नैतिकता नाही. कारण त्यांच्या जातीच्या दाखल्याचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत वादग्रस्त ठरला आहे. त्यासही कारणीभूत मोहिते पाटीलच. ते सळो की पळो करायचे. इव्हीएमवरून जानकर राजीनाम्याची घोषणा करतात. शिवाय त्यांनी स्थापन केलेला चांदापुरी सहकारी साखर कारखाना कुठे आहे. याचा भूगोलात शोध घ्यावा लागेल. शेतकरी हे विसरेल कसा?
आज रविवारअखेर 288 पैकी 280आमदारांनी विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. आठ आमदार गैरहजर असून त्यामध्ये पहिले नाव आहे उत्तम जानकर. त्यांनी शपथच घेतली नाही तर आमदार म्हणून विधीमंडळात हजर राहण्याचा आणि इव्हीएमवर आव्वाज उठवण्याचा अधिक़ारही राहणार नाही. आमदारकीच्या सदस्यत्वाची शपथ घेवून इव्हीएमच्या रडकथेचा पुढील अंक चालू करणे शक्य आहे. पण जानकर नेहमीच्या स्टाईलमध्येच वावरतात. ती स्टाईल प्रसिध्दीचा स्टंट म्हणून "उत्तम". अन्यथा लेने के देने. त्याचा पुढील अंक सुरू झाला तर?
What's Your Reaction?






