उडदामाजी काळे गोरे (गोर्‍हे)

उडदामाजी काळे गोरे (गोर्‍हे)

Feb 24, 2025 - 17:16
 0  379
उडदामाजी काळे गोरे (गोर्‍हे)

शिवसेनेत पद देण्यासाठी दोन मर्सिडिज, असे विधान पूर्वाश्रमीच्या कडवट समाजवादी (पुरोगामी) नेत्या आणि विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिल्लीत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केल्या. त्यांचे विधान धक्कादायक मुळीच नाही. पण अर्धसत्य आहे. कारण दिल्या, घेतल्याशिवाय त्यांना हे काही मिळालेलं नाही. पण स्वत:ची स्वच्छ प्रतिमा हे सांगण्यासाठी केलेला खटाटोप म्हणजे आरशात आपलाच चेहरा पाहण्यासारखा. उबाठा, ठाकरे, राऊत यांच्याविषयी बोलले की टीआरपी मिळतो. आणि आपल्या नेत्याची मर्जी देखील राखली. त्यासाठीचा त्यांचा अट्टाहास. मात्र त्यांनी हे विधान करण्यासाठी जे व्यासपीठ वापरले. हे उचित नाही. 

    यामुळे साहित्य संमेलन संयोजक सरहद्द संघटना, संजय नहार, मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षा उषा तांबे तोंडघशी पडलेत. त्यांचा यथायोग्य समाचार संजय राऊतांनी घेतलाच. दिल्या घेतल्याशिवाय का पदं मिळतात? पण हे जाहीरपणे सांगण्याची खुमखुमी नीलम गोर्‍हे यांना झाली. उडदामाजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे? अशी व्याख्या केली जाते. गोर्‍हे यांनी केलेले विधान काळ्या कृत्याकडे अंगुलीनिर्देश करणारे आहे. त्या देखील त्याच मांडवातून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही त्यांचा आरसा दिसतोच. निवडणूक काळात तिकीटं देताना पार्टी फंड घेतला जातोच. तो किती उघड आणि किती बंद हे ज्याचे त्यालाच माहीत. गोर्‍हे यांचा रोख पक्षाकडे की पक्षप्रमुखांकडे की अन्य कोणी? मुळात त्या मुळच्या शिवसेनेच्या नव्हेतच. नव्हत्याच. शिवसैनिक वगैरे वगैरे नाही. त्या समाजवादी विचाराच्या मुशीतून आलेल्या पुरोगामी नेत्या. सध्या शिवसेनेत अशाच नेत्यांची चलती आहे. नव्याने आलेल्या किंवा अन्य विचारसरणी (हिंदुत्वाला ए़केकाळी शिव्याशाप देणार्‍या), अन्य पक्षातून आलेल्या महिला नेत्यांना मोठी पदं मिळालीत. राज्यसभेच्या खासदारही झाल्यात. तर काही विधान परिषदेच्या प्रतीक्षेत आहेत. नीलमताई यांचंही शिवसेनेत चांगभलं झालं. विधान परिषदेची चार टर्म आमदारकी, उपसभापती आणि सभापतीपदासाठीची आस. एकत्र शिवसेना असताना काही वर्षांपूर्वी, फडणवीस यांनी नाईलाजाने ठाकरेंच्या मर्जीखातर दिलं. त्या बदल्यात नीलमताईंनी ठाकरेंना मर्सिडीच दिल्या का माहीत नाही. त्यांनी गौप्यस्फोट करून दिल्या घेतल्याशिवाय मिळत नाही, हे अधोरेखित केलं. परंतु जशी मर्सिडिज गाडी, तशी भारी साडीशिवाय ताईंची भेट मिळत नाही, हा नीलमताईंचा चेहरा शिवसैनिकांनीच उघड केला. त्यामुळे टीका करताना आपणही किती स्वच्छ आहोत, हे देखील पाहिलं पाहिजे. म्हणून उडदामाजी काळे गोरे (गोर्‍हे). 

   गोर्‍हेंनी केवळ शिवसेनेची अंदर की बात सांगितली. तशी बात त्यांनी साहित्य संमेलन संयोजकांविषयी देखील केली. मुळात साहित्य संमेलन संयोजकांनी त्यांची मुलाखत घेण्याचे प्रयोजनच काय? दिल्लीत संमेलन भरवण्याविषयी प्रारंभी नाराजी व्यक्त झाली. पाहुणे व उद्घाटन स्थान ठरवण्यावरूनही उलटसुलट चर्चा. प्रत्यक्ष उद्घाटन सत्रात मोदी यांनी सगळा नॅरेटिव्हच (नूर) बदलला. पुरोगामी विचारवंत साहित्यिकांची तर बोलतीच बंद. त्यात भर शरद पवारांची देहबोली. व्यासपीठावर त्यांची केलेली आस्तपुस्त. त्यामुळे साहित्य संमेलन संयोजक आणि रसिकही सुखावले. पण समारोपादिनी नीलम गोर्‍हे यांना सन्मान देऊन संयोजकांनी कुर्‍हाड मारून घेतली. म्हणजे गोर्‍यांचे काळे झाले. बुंदसे गयी वह... अशी अवस्था झाली असेल. आणि दरएक साहित्य संमेलन म्हणजे वाद. वादाशिवाय संमेलनाचे सूप वाजत नाही. गोर्‍हे यांच्या हातात हे सूप गेले आणि....

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow