बळीराजाला सुख-समाधान लाभावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पांडुरंगाला साकडं!
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; मानाच्या वारकऱ्यांना कायमस्वरूपी एसटी पास – पंढरपूर दर्शन मंडपासाठी १३० कोटींचा निधी
पंढरपूर : कार्तिकी वारी २०२५ च्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी भाविक, वारकरी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. “राज्यातील बळीराजावर आलेले संकट दूर होऊ दे, त्याला सुख-समाधान लाभू दे,” असे साकडं पांडुरंगाला घालत त्यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. (Farmer Supports)
शिंदे म्हणाले की, अलीकडील अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. “या संकटात शासन शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही,” असे आश्वासन देत त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून ती कामाला लागली आहे. “शेतकऱ्यांचा प्रश्न ही केवळ आर्थिक गोष्ट नाही, ती आपल्या अन्नदात्याच्या जगण्याशी निगडित आहे. त्याला सन्मानाने जगता यावे, हीच आमची प्राथमिकता आहे,” असे शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी ठोस पावले आणि विकासाचा रोडमॅप
राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. “बळीराजावर संकट असले तरी त्याला उभं राहायला आम्ही सर्वतोपरी मदत करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
वारकऱ्यांसाठी ‘मोफत पास’ कायमस्वरूपी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाविकांसाठी मोठी घोषणा केली. “राज्य परिवहन महामंडळामार्फत मानाच्या वारकऱ्यांना दरवर्षी मोफत प्रवास पास दिला जातो. आता हा पास कायमस्वरूपी करण्यात येणार आहे,” असे त्यांनी जाहीर केले. या निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिंदे म्हणाले, “वारकरी हाच खरा व्हीआयपी आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्हीआयपी सुविधा बंद केल्या आहेत. भाविकांना सुलभ, सोयीस्कर आणि समान संधीने दर्शन मिळावे, हेच आमचे ध्येय आहे.”
दर्शन मंडपाचे काम वेगात – १३० कोटींचा निधी मंजूर
पंढरपूरमध्ये दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारीदरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
“हे काम जलद गतीने पूर्ण करून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,” असे निर्देश शिंदे यांनी प्रशासनाला दिले. त्यांनी पुढे सांगितले, “दर्शन रांगेत पाणी, बैठक व्यवस्था, शौचालय आदी सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात. भाविकांना त्रास होऊ नये हे आमचे प्राधान्य आहे.”
मंदिर विकासासाठी महत्त्वाचे निर्णय
मंदिर परिसरातील जागांच्या वापराबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे असलेली जागा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे आणखी ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्याचा करार लवकरच करण्यात येणार आहे. तसेच सर्वे क्रमांक १६१ मधील जागा मंदिर समितीला देण्यासाठी पुढील महिन्यात नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावर्षी प्रथमच शालेय विद्यार्थी कु. मानसी आनंद माळी व चि. आर्य समाधान थोरात यांची ‘विद्यार्थी मानकरी’ म्हणून निवड करण्यात आली. या नव्या संकल्पनेबद्दल शिंदे यांनी कौतुक व्यक्त केले.
नद्यांचे प्रदूषण मुक्ती व अतिरिक्त निधीची घोषणा
राज्य विकासाच्या दृष्टीने शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “आपले राज्य सर्व क्षेत्रात अग्रस्थानी राहावे, हीच आपली दिशा आहे. चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.” कार्तिकी वारीदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त पाच कोटी रुपयांचा निधी तात्काळ देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. “वारकऱ्यांच्या श्रद्धेला आणि भक्तीला शासन सलाम करते. वारी ही आपल्या संस्कृतीचा प्राण आहे,” असे ते म्हणाले.
महापूजा आणि मान्यवर उपस्थिती
कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. मानाचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सौ. सुशिलाबाई यांच्याही हस्ते पूजन झाले. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवताडे, तानाजी सावंत, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले, तर आभार मान्यवरांच्या वतीने राजेंद्र शेळके यांनी मानले. कार्यक्रमात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने तयार केलेल्या २०२६ च्या दैनंदिनीचे प्रकाशनही करण्यात आले.
“भक्त, वारकरी आणि शेतकरी सुखी राहावेत, हीच आमची भावना” — एकनाथ शिंदे
समारोपात शिंदे म्हणाले, “भक्त, वारकरी आणि शेतकरी सुखी राहावेत, हीच आमची भावना आहे. शासनाच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू सामान्य नागरिक आहे. राज्य सर्व क्षेत्रात प्रगत व्हावे आणि पांडुरंगाची कृपा सर्वांवर राहो, हीच आमची प्रार्थना.”
What's Your Reaction?