मुंबई विमानसेवेचा मुहूर्त लांबणार
विक्री न झालेल्या तिकिटावरील अनुदानाची प्रतीक्षा

सोलापूर : सोलापूर - गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर १ ऑगस्टपासून मुंबई विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती. मात्र, अद्यापही या मार्गावरील विमानसेवेच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंगला (विक्री न झालेल्या तिकिटावरील अनुदान) राज्य सरकारने मंजुरी दिलेली नसल्याने विमानसेवा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
९ जूनपासून सुरू झालेल्या सोलापूर-गोवा विमानसेवेला मागील महिनाभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सुरवातीपासूनच सोलापूरकरांची मूळ मागणी सोलापूर- मुंबई व सोलापूर-तिरुपती या मार्गावरील हवाईसेवेची आहे. सोलापूर- मुंबई मार्गावर १ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपनीला राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्य व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता. हा निर्णय अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे, मुंबई- सोलापूरसाठी राखीव ठेवण्यात आलेला स्लॉटही रद्द झाला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळे सोलापूर- मुंबई विमानसेवा निश्चित कधी सुरू होईल, याबद्दल शंका व्यक्त होत आहे.
सध्या तरी सोलापूर- गोवा ही एकच सेवा सोलापूर विमानतळावरून सुरू आहे. सोलापूर- मुंबई मार्गावरील विमानसेवेबद्दल विमानतळ प्राधिकरणाकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
- अंजली शर्मा, सहायक व्यवस्थापक,सोलापूर विमानतळ
What's Your Reaction?






