उमेदवाराचे भवितव्य ठरविणारे एबी फॉर्म आणि बेडूक़ उड्या
खरटमल, चंदेले, मानेंसह काडादींची कोंडी
(विजयकुमार पिसे)
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम वेळ काही तासांवर येऊन ठेपलीय, अद्यापही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर केलेले नाहीत, ज्यांना निरोप आले अथवा नाही, तरीही विश्वास ठेवून अनेकांनी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले. पण शेवटी अध़िकृत उमेदवाराचे भवितव्य *एबी फॉर्म नक्की करणार. एबी फॉर्म नसेल तर उमेदवाराचा अर्ज बाद ठरतो. कधी कधी घाई गडबडीत फॉर्म चुकला तर उमेदवार बाद होतो, तेव्हा पर्यायाने पक्षाला याचा फटका बसतो. काहींना एबी फॉर्म हातात मिळतो, पण अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणापर्यंत चमत्कार होतो, आणि होत्याचे नव्हते झाल्याचे अनेक प्रकरणं आहेत. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांचे नाव अग्रक्रमावर घेता येईल.
गत (2024)विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापुरातही असेच चमत्कार झाले, आणि दोन मालकांना पस्तावण्याची वेळ आली. गत निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकार्याचा जाळ काढला, अशी चर्चा होती. पण त्यात तथ आढळले नाही.
सुधीर खरटमल सुशीलकुमार शिंदे यांचे बिनीचे सरदार. काँग्रेसी असले तरी त्यांची ओळख शिंदे समर्थक अशीच. गत दहा वर्षात त्यांनी तीन तीन वेळा पक्ष बदलले. ते हिंदुत्ववादी पक्षात येणार अशी आवई देखील उठवली जाते. आणि सांगितले जाते की, विकाससाठी मी या पक्षात प्रवेश केला. विकास म्हणजे काय याचा *अर्थ काय? नेमका *अर्थ काढायला गेला तर गल्लत होईल. इतका त्यामागे *अर्थ दडलाय. असो.
सुधीर खरटमल यांना 2009 मध्ये तेव्हाच्या उत्तर सोलापूर (राखीव)मधून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूकही निघाली. हातात एबी फॉर्म देखील होता. त्यामुळे कसलीच शंका आणि अडचण नव्हती. खरटमल यांच्यासाठी शिंदेसाहेब जीव की प्राण. अचानक निरोप आला फॉर्म भरू नका. झाले. त्यांच्या नशिबी जो वनवास आला तो कायमचाच. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. नंतर ते राष्ट्रवादीमय झाले. तिथेही मोठी जबाबदारी. आता ते 'दादा'मय आहेत. एबी फॉर्म हातात असूनही नशिबाने त्यांची थट्टा मांडली.
त्याच वर्षीच्या निवडणुकीत माजी महापौर असलेल्या नलिनी चंदेले या शहर मध्य (तेव्हाचा शहर दक्षिण) इच्छुक होत्या. मिरवणूक़ काढून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयापर्यंत आल्या. पण अंतर्गत वादामुळे संधी गेली. ती कायमचीच. नंतर त्या आकस्मिकपणे भाजपात आल्या. 2014 मध्ये उमेदवारीचा आलेला घास तितक्याच अचानकपणे गेला. आतापर्यंत त्यांनी चार पक्ष बदलले. पण माजी महापौर हेच पद कायम राहिले. निष्ठा टिकवली असती तर आज त्यांच्या नावासमोर आमदार हे पद लागले असते.
गत विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापुरात काँग्रेसी कुरघोडी झाल्या. मालक आणि मालक असाच संघर्ष शेवटपर्यंत. हे कोडे काँग्रेस वा खा.प्रणितीताईंना देखील सोडवता आले नाही. आणि शेवटी एबी फॉर्म न मिळाल्यामुळे विधानसभेची हमखास शर्यत जिंकू शकणारे दिलीप माने मालक यांना माघार घेणे भाग पडले. शिंदेंचे दुसरे निकटवर्तीय धर्मराज काडादी यांनाही एबी फॉर्म मिळाला नाही. काँग्रेसची संमती होती. या ठिकाणी संजय राऊतांच्या सांगली पॅटर्न खेळीमुळे काँग्रेसचा घात झाला. काडादी काँग्रेसी असूनही त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही. शिंदे पवार या दोन दिग्गज नेत्यांच्या विश्वासावर लढले. शेवटच्या दिवशी शिंदे परिवाराने सांगली पॅटर्न गुंडाळून काडादींना पाठिंबा जाहीर केला. वेळ निघून गेली होती. बिचारे काडादी चार नंबरवर फेकले गेले आणि सामान्य उमेदवार अपक्ष बाबा मिस्त्री दुसर्या क्रमांकाची मते घेत हिरो ठरले.
असाच एक प्रकार 2017 मध्ये झाला. एबी फॉर्म पळवापळवीचे प्रकार घडले. अध़िकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे पाटील नामक उमेदवाराने भर रस्त्यावर गोंधळ घालत जाळ काढला. पक्षाच्या पदाधिक़ार्याने मर्जीतले उमेदवारास महापौर करण्यासाठी अन्य एका उमेदवारला दुसराच एबी फॉर्म दिला. परिणामी त्या महिला उमेदवाराचा अध़िकृत अर्ज बाद झाला. शिवाय निवडणुकीत पराभव देखील. याच गोंधळात एबी फॉर्मचा खो खो पाहायला मिळाला. आणि एका उमेदवाराचे नशिब चमकले. त्या मेंबर झाल्या.
एबी फॉर्मचे महत्व काय?
निवडणुकीत एबी फॉर्म हा परवलीचा शब्द. संबंधित उमेदवारास हा फॉर्म मिळाला तर तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरतो. तसेच त्याला पक्षाचे चिन्ह मिळते. एबी फॉर्म हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे. या फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते. शिवाय अधिकृत उमेदवारासह पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे पर्यायी नाव असते. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला अथवा माघार घेतली तर तर दुसर्या उमेदवाराला निवडणूक आयोग अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करु शकतो.
What's Your Reaction?