ते 'शिखरा'वर, आणि आम्ही!

'एक कुटुंब एक परिवार'साठी म्हणूया फक्त जय हो!

Sep 19, 2024 - 00:51
 0  331
ते 'शिखरा'वर, आणि आम्ही!

सोलापूर लोकसभा निवडणुकीत ताईंसाठी काय पण! या भावनेने सगळेच जण स्वतःला 'जुंपून' घेतले. ताईंना खासदार केलं आणि आता आमच्यासाठी काय? फक्त जय हो!

 विधानसभेच्या निवडणुका दोन महिने उशिरा, तरीही अनेक इच्छुक उमेदवार अस्वस्थ आहेत. पण ते 'शिखरा'वर आहेत. ताईंसाठी अनेकांना शब्द दिला, अनेकांनी शब्द घेतला. म्हणून सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मुस्लिम समाजाला मिळणार. एमआयएमचे फारुख भाई, तुतारीचे तौफीकभाई, कामगारांचे मास्तर असे कैक 'जन वात्सल्य'वर पायधूळ झाडत आहेत. गणपती बाप्पांचे जोरात स्वागत झाले. परंतु खासदार ताई बाप्पांच्या दर्शनाला मंडळात दिसल्या नाहीत, अशीही एक चर्चा. तरीही कैक इच्छुक जाई जुईच्या फार्म हाऊसवरील गणराया चरणी 'लीन' झाले. जेणेकरून साहेब आमच्यावर प्रसन्न होतील. अनेक उत्सवी आणि उत्साही तरुण मंडळांनी गणरायासाठी ताईंची प्रतीक्षा केली. बाप्पाला निरोप देण्याआधी २४ तास 'शिखर' उतरून 'स्वारी'ने उत्सवी, उत्साही मंडळांना भेटी दिल्या. हे बाप्पांचे 'दर्शन' होते की विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना 'दर्शन'! अपेक्षित संदेश जो पाहिजे तो गेला. म्हणजे 'न्यारेटिव्ह' प्रस्थापित केला. चेतन भाऊ म्हणालेच आहेत, सर्वच जागा आम्ही लढणार. कारण

 आम्ही 'शिखरा'वर आहोत आणि तुम्ही? दत्तनगरचे मास्तर, पवार साहेबांना भेटले आणि.... हुंदका दाटून आला म्हणे. सोनियाच्या दारी सिताराम निपचित झाले. विदर्भातील नानांना (पटोले)पटवले. साहेबांनाही भेटले पण गॅरंटी कुठाय? आम्ही भीक नाही, हक्काचं मागतोय म्हणत कामगारांंसाठी लढणार, त्यांच्या हक्काचा आमदार होणार, हा निर्धार! 'शिखरा'साठी ते शब्द पाळणार नाही ही गॅरंटी. म्हणून हैदराबादकर ओवैसीनी फारुख भाई यांना शब्दच दिला, नव्हे तर उमेदवारीच जाहीर केली. त्यांचाही निर्धार जे होईल ते आरपार. आता प्रश्न भाईजान मंडळींचा त्यांच्या शब्दाला साहेब जागणार की त्यांना शिखरावर बसवणार. साहेबांसाठी चाळीस वर्षे, २००४ मध्ये आई साहेबांसाठी, २००९ पासून ताईंसाठी! सबकुछ एक कुटुंब एक परिवार!!

 आता दिवाळीत फटाके फोडायचेत आमच्यासाठी, कारण आम्हीच आहोत 'शिखरा'वर! हे 'शिखर' कोण? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून यंदा गणरायाचे निरोप घेताना लॉन्चिंग केले. ४० वर्षापासून साहेब, आईसाहेब, ताई आणि आता 'शिखरा'वर 'नातू'! म्हणतात ना 'एक कुटुंब, एक परिवार' जय हो!!!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow