देश को विश्‍वगुरू बनाना है।

विहिंप मुंबई क्षेत्र परिषद शिक्षा वर्ग समारोहप्रसंगी क्षेत्र मंत्री गोविंद जी शेंडे यांचे प्रशिक्षित कार्यकर्त्यांना आवाहन

May 15, 2025 - 23:27
 1  532
देश को विश्‍वगुरू बनाना है।
विहिंप शिक्षा वर्गाचा अहवाल मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्याप्रसंगीचे छायाचित्र.

(मुंबई : भाईंदर केशव सृष्टी : विजयकुमार पिसे)
      स्वा.सावरकर यांचे 'सागरा प्राण तळमळला' या देशभक्तीपर गीताने आपण भारून जातो, देशभक्तीची उर्मी येते. पण या गीताने आपण देशासाठी, धर्मासाठी किती सक्रिय होतो, किती वेळ देतो, हिंदू समाज जागरणाचे कार्य किती गतीने करतो याकडे लक्ष वेधून कटिबद्ध होण्याचे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री श्री. गोविंद जी शेंडे यांनी केले.  मुंबई जवळील भाईंदर केशव सृष्टी येथे विश्‍व हिंदू परिषद क्षेत्रीय शिक्षा वर्गाचा समारोह बुधवारी 14 मे रोजी संपन्न झाला. महाराष्ट्र व गोवा राज्यभरातील सहभागी शिक्षार्थी कार्यक़र्त्यांना आवाहन करताना श्री. शेंडे यांनी देशाला विश्‍वगुरू करण्यासाठी कटिबध्द व्हा, असे सांगितले. या समारोह सोहळ्याप्रसंगी प्रमुुख पाहुण्या केशवसृष्टी येथील राम रत्ना विद्या मंदिरच्या प्राचार्या कविता सिंग, शिक्षा वर्गाचे वर्ग प्रमुख अ‍ॅड.सतीश गोरडे, पालक संजय मुद्राळे, बौध्दिक प्रमुख राजीव जहागीरदार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वर्गाचा अहवाल मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला.
    प्रारंभी भारतमाता, राम,सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. क्षेत्र मंत्री श्री.शेंडे यांनी सांगितले की, मंथनातून अनेक  चांगले विचार समजतात, प्रबोधन होते. परिषद वर्ग देखील असाच दृष्टिकोन समोर ठेवून विश्‍व हिंदू परिषदेने, कार्यकर्ता आपल्या कार्यक्षेत्रात सजगपणे सक्रिय होऊन अधिक गतीने काम करण्यासाठी सुरू केला. अशोकजी सिंघल यांनी 2008 मध्ये सर्वप्रथम ही संकल्पना प्रमुख कार्यकर्ते पदाधिक़ारी यांच्यासमोर मांडली. सात दिवस या बैठकीत विचार मंथन झाले. देशभरातून 1500 पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर नियमितपणे दरवर्षी संपूर्ण देशभरात अशा प्रकारचे परिषद शिक्षा वर्ग होतात. याशिवाय बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती या अन्य आयामाचे शिक्षा वर्ग प्रांत स्तरावर होतात.  यातून संघटनेचा विस्तृत परिचय होतो, कार्याची दिशा मिळते, आंदोलने, बैठका, कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जागरणाचे, समरसतेचे कार्य होते.
1964 मध्ये विहिंप स्थापनेप्रसंगी शंकराचार्य, धर्माचार्यांनी 'हिंदव: सोदरा: सर्वे' चा संदेश दिला. धर्मांतरण होणार नाही, असा निश्‍चय केला. तेव्हापासून विहिंपचे विश्‍वव्यापी कार्य अखंडपणे सुरू आहे. आपला देश विश्‍वव्यापी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजगपणे कार्य केले पाहिजे. आपले अनेक छोटे मोठे व्यवसाय इस्लाम धर्मीयांच्या हातात जात आहेत. हिंदूंची लोकसंख्या घटत आहे. समाजात व्यसनाधिनता वाढत आहे. समलैंगिक जीवनशैली वाढत आहे. ही बाब गंभीर असून यावर मात करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते हिंदू समाज समरस, संघटित आणि सशक्त करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. सागरा प्राण तळमळला हे गीत केवळ ऐकून, गाऊन चालणार नाही, कृतीत आणण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन क्षेत्र मंत्री श्री. शेंडे यांनी केले.

भाईन्दर केशव सृष्टी येथे विहिंप शिक्षा वर्गात सहभागी शिक्षार्थी  यांचे छायाचित्र.

 बच्चा बच्चा ध्येयपथाकडे : प्राचार्या कविता सिंग
प्रमुख पाहुण्या प्राचार्या कविता सिंग म्हणाल्या,  महिला सशक्तीकरणाच्या कामात विहिंपचे बंधू आणि भगिनी एकत्रित झटतात, समाजात परिवर्तन निश्‍चित आहे. गाँव गाँव, बच्चा बच्चा ध्येयपथाकडे जातील आणि संपूर्ण जग विश्‍व हिंदू परिषदमय करतील असा विश्‍वास आहे. 
    वर्ग प्रमुख अ‍ॅड.सतीशजी गोरडे यांनी 4 मे ते 14 मे पर्यंत पार पडलेल्या क्षेत्र परिषद शिक्षा वर्गाची माहिती सांगितली. गोमंतक-कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ या चार प्रांतातून 172 शिक्षार्थी सहभागी झाले होते. पहाटे साडेचारपासून रात्री साडेदहापर्यंत होणारे विविध शारीरिक, बौध्दिक कार्यक्रम, सत्संग, कृतीसत्र, योगासन प्राणायाम अशा विविध सत्रांची माहिती अ‍ॅड.गोरडे यांनी दिली. शिक्षार्थींच्या लेखी परिषदेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण चार शिक्षार्थींचा गौरव करण्यात आला. समारोप सोहळ्याचे सूत्र संचालन बौध्दिक प्रमुख राजीव जहागिरदार यांनी केले. पसायदान आणि विजय महामंत्राने परिषद शिक्षा वर्गाचा समारोप झाला.
   परिषद शिक्षा वर्ग यशस्वीतेसाठी क्षेत्र सहमंत्री रामचंद्र रामुका, कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर,  संघटनमंत्री अनिरुध्द पंडित, मुख्य शिक्षक गजानन राणे, सहबौध्दिक प्रमुख माधव बर्वे, पुरुषोत्तम काळे, वर्ग व्यवस्था प्रमुख महेश मिस्त्री, परशुराम दुबे यांचे मार्गदर्शन लाभले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow