पुराच्या पाण्यामुळे रेस्क्यू टीमची बोट पंक्चर

संगोबा मंदिरात 90 जण अडकले,मोठा अनर्थ टळला

Sep 24, 2025 - 00:19
 0  200
पुराच्या पाण्यामुळे रेस्क्यू टीमची बोट पंक्चर

(विजयकुमार पिसे)

    पावसाने रौद्र रूप धारण केले आहे, थांबण्याचे नाव घेईना, नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचा थरकाप उडाला आहे. त्यात कहर म्हणजे पुराच्या पाण्यामुळे रेसक्यू टीमची बोट पंक्चर झाली. सीना नदीकाठच्या भागातील संगोबा मंदिरात 90 जण अडकले असून आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. आमचा जीव वाचवा, गावकर्‍यांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आहे.

     करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरात अडकलेल्या 90 जणांचे रेस्क्यू करण्यासाठी आलेली रेस्क्यू बोट रस्त्याचा अंदाज न आल्याने पाण्यात अडकली होती. सर्वांना सुखरूप काढताना रेस्क्यू बोट पंक्चर झाली. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगानंतर त्यावर बसलेल्या दोन पुरूष, एक महिला व मुलाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने थर्माकोलच्या प्लेटवर हलवण्यात आले. नागरिकांबरोबर महसूल कर्मचारी अडकल्याची माहिती असून हेलिकॉप्टर अथवा एनडीआरएफ टीमच्या सहाय्याने वाचविण्याची मंदिरात अडकलेल्या नागरिकांची मागणी आहे. संगोबा मंदिर परिसरात गाव उंचावर असून ग्रामस्थ मंदिरात आले आहेत. या मंदिराच्या चहूबाजूने पुराचे पाणी वेढलेले आहे. येथे अडकलेले लोक प्रशासनाकडे मदतीची विनंती करत आहेत. 

    सीनाकाठच्या सगळ्या गावांमध्ये पाणी वाढले आहे. पूल पाण्यात गेले आहेत. गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जीव महत्त्वाचा आहे. सत्ता, संपत्ती वाहून गेली आहे. आम्हाला केवळ आमच्या जीवाची पर्वा आहे. आम्हाला वाचवण्यासाटी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंती व्हिडिओद्वारे ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान इंदापूर येथून आपत्ती व्यवस्थापन मदत पथक तिथे दाखल झाले आहे. त्यांच्या सहाय्याने सर्वांची सुटका होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow