मारकडवाडीला कलाटणी, जानकरांचा राजीनामा?
म्हणाले, बॅलट पेपरवर पोटनिवडणूक घ्या!

(विजयकुमार पिसे)
विधानसभा निवडणूक निकालानंतर देशाच्या नकाशावर आलेल्या मारकडवाडीला पुन्हा कलाटणी मिळाली आहे. माळशिरसचे पवार गटाचे आ.उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यांच्या राजीनामा पत्रात जानकर यांनी बॅलट पेपरवर पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. जानकर यांनी राजीनामा दिला असला तरी तांत्रिकदृष्ट्या त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला पाहिजे. त्यामुळे हा स्टंट असल्याचीही चर्चा आहे. चर्चेत राहण्यासाठी जानकर यांनी हे पाऊल उचलले आहे, असे मानले जाते.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी विद्यमान भाजपा आ. राम सातपुते यांनी यांचा पराभव केला. याबद्दल पराभूत उमेदवाराचीही काही तक्रार नाही. पण मारकडवाडीत सातपुते यांना जानकरांपेक्षा सर्वाधिक मते मिळाली. इव्हीएम घोटाळा झाला, अशी जानकर यांची तक्रार आहे. राज्यात भाजपा आणि महायुतीला अनपेक्षित यश मिळाले, अनपेक्षित जागा मिळाल्या. विधानसभेत विरोधी पक्ष तांत्रिकदृष्ट्या नावालाही राहिला नाही. यामागे इव्हीएम आहे, अशी तक्रार पराभूत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाआघाडीची आहे. वैफल्यग्रस्त भावनेतून हा आरोप असल्याचा टोला भाजपाने लगावला. पण इव्हीएम विरोधात देशभर चळवळ उभी करण्याचा विडा "इंडी" आघाडीने उचलला, त्याची सुरवात मारकडवाडीतूनच झाली. त्यामुळे देशाच्या नकाशावर या वाडीचे नाव झळकले. दरम्यानच्या काळात हे चहाच्या पेल्यातील वादळ होती की काय, अशी स्थिती होती. आता. त्या पार्श्वभूमीवर आ.जानकर यांनी शनिवारी राजीनामा सुपूर्द करून चर्चेला तोंड फोडले आहे.
वादाची ठिणगी पडली तेव्हा मारकडवाडीत जानकर समर्थकांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने हाणून पाडला. त्यानंतर धानोरे गावातूनही अशीच तक्रार पुढे आली, असे नमूद करून आ.जानकर यांनी संपूर्ण मतदारसंघात पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेणे किंवा व्हीव्ही पॅटमधून चिट्ठी हातात घेऊन ती मतदारांच्या हाताने व्ही व्ही पॅटमध्ये टाकणे अशा प्रकारे फेरमतदगन घ्यावे, असे माझे मत आहे. पारदर्शीपणे मतदान घेण्यासाठी आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचे आ.जानकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
What's Your Reaction?






