तडीपार, दगाबाज आणि भाकरी
तडीपार, दगाबाज आणि भाकरी

देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. त्यामुळे पोलीस रेकॉर्डवरील तडीपार हा शब्द राजकीय वर्तुळात वादाचा केंद्रबिंदू झाला आहे. अमित शाह गुजरातचे गृहमंत्री होते. तेव्हा एनकाउंटरच्या घटनांना केंद्रातील काँग्रेसी सरकारने राजकीय सूडबुध्दीतून शाह यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याच राज्यात तपास यंत्रणा प्रभावित करू शकतात, म्हणून त्याची सुनावणी मुंबईत केली. विशेष म्हणजे न्यायालयाने या खटल्यात शाह यांना दोषमुक्त केले. या सुनावणीसाठी शाह गुजरातबाहेर गेले याचा अर्थ पवार साहेबांच्या दृष्टीने तडीपार!
हेच तडीपार अमित शाह उत्तरप्रदेशचे प्रभारी झाले आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 55 जागा जिंकून दिल्या. दिल्लीत भाजपाला सत्तेत बसवण्यात या जागा निर्णायक ठरल्या. गुजरातेतून तडीपार (?) नेत्याने ही गती आजतागायत कायम ठेवली. महाराष्ट्रातील कोणत्या (जाणते नेतेसह) शीर्षस्थ नेतृत्वाला आपल्या राज्याबाहेर असे यश मिळवता आले आहे का?
*दगाबाज....
तडीपारचे दोन अर्थ या टीका अधोेरेखित झाले आहेत. तसेच दगाबाज राजकारण म्हटले की फक्त महाराष्ट्र. आणि मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांना पायउतार करून सत्ता हस्तगत करणारे शरद पवार! इतिहासातील हा दाखला पाठीत खंजीर खुपसला म्हणून कायमचा राहिला. ती ओळखही कायमची राहिली. तडीपार मात्र केवळ पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी लागू होतो. शाह पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत का? हा प्रश्न उपस्थित होतो. पण महाराष्ट्राचे एक गृहमंत्री 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात पायउतार होतात आणि वर्षभर सरकारी पाहुणचार घेतात. ते गृहमंत्री अनिल देशमुख पवारांच्याच पक्षाचे नेते. हे रेकॉर्डवर आहे.
*भाकरी फिरवणार
1999 मध्ये सोनियाजी गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसमधून बाहेर पडलेले शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली. आणि सहा महिन्यात पुन्हा विदेशी(?) सोनियाजींशी हातमिळवणी करून आपण सत्तातुर आहोत, हे रेकॉर्ड केले. 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 या पावशतकात त्यांच्या पक्षाचा आलेख किती उंच (!) गेला आहे. याचा शोध रेकॉर्डवर आहेच. अशा स्थितीत महाराष्ट्रातील मतदारांनी केवळ दहा जागा देवून रेकॉर्ड केला आहे. न पेक्षा काँग्रेस अजून बरी. त्या पक्षाचा आचार विचार भले भाजपाशी पटत नसेल. पण काँग्रेस पक्षाला आपल्या अस्तित्वाची भीती नाही. इथे मात्र मी, पुतण्या, मुलगी, नातू पुढे पणतू या भोवतीच पक्ष फिरत राहणार. हे सोडून सर्वांची भाकरी फिरवणार. भाकरी फिरवण्याच्या प्रकियेत कधी अर्धी/कच्ची तर कधी करपलेली. आणि राजकीय संन्यास घेण्याच्या स्वघोषणेपासून 24 तासात स्वत:च यू टर्न. हे कितीवेळा. हे देखील ऑन-रेकॉर्ड आहे.
What's Your Reaction?






