बिहारमध्ये मराठमोळ्या शिलेदाराचा सुपर झटका
राहुल,तेजस्वी,प्रशांत किशोर, बाहुबलीचा सुफडा साफ, सर्वच "पोल" ठरले पुन्हा "एक्झीट"
(विजयकुमार पिसे)
बिहारच्या निवडणुकीत भाजपाला सुपर डुपर यश मिळाले, त्या यशाचा शिलेदार आहे मराठमोळा कार्यकर्ता. 2019 मध्ये ज्याचं तिकीट कापलं, असे महाराष्ट्राचे संभाव्य गृहमंत्री. दुर्दैवाने त्यांना दिल्लीत बस्तान बसवावे लागले. पण तिथेही आपला प्रभाव दाखवला. आणि राहुल गांधी, तेजस्वी यादव,रणनितीकार प्रशांत किशोर आणि बाहुबली पप्पू यादव यांना सुपर झटका दिला असा हा शिलेदार म्हणजे बिहारचे प्रभारी विनोद तावडे.
एनडीएने सर्व "एक्झीट" "पोल"चेही अंदाज चुकवून 200 पेक्षा अधिक जागा जिंकल्या. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. बिहारी जनतेने पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या जोडीला साथ दिली. मात्र या यशाचे गमक आहेत, निवडणूक रणनीतीकार विनोद तावडे आणि धर्मेंद्र प्रधान.
बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली असून विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. विनोद तावडे यांचे नाव महाराष्ट्राला सुपरिचित असून 2014 मध्ये राज्यात भाजपा सरकार आले तेव्हा तावडे गृहमंत्री होतील, असा कयास होता. त्यांची देखील तशी इच्छा होती. परंतु डिग्री प्रकरणाचा डाग लावण्यात आला. पुढे आपल्याला प्रतिस्पर्धीच नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी 2019 मध्ये त्यांचे तिकीट कापण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे दादा आणि तावडे दोघेही अभाविपचे. तावडे देखील मराठा चेहरा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी, पक्षनिष्ठा यामुळे तावडे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते. ही चर्चा त्यांच्यासाठी अडचणीची ठरली.
"असू पत्थर पायातील", या संघगीतानुसार संघटनेने दिलेली जबाबदारी शिरोधार्य मानून तावडे दिल्लीत राष्ट्रीय सचिव म्हणून गेले. नंतर चढत्या क्रमाने पक्षाचे महामंत्री झाले. अनेक निवडणुकांचे रणनीतीकार होतेच. शिवाय जिथे जिथे प्रभारी म्हणून गेले, तिथे भाजपाची सरशी केली. बिहारमध्ये अगदी ताजा आणि शेवटचा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे लोकगायिका मैथिली ठाकूर हिचा भाजपा प्रवेश. तिला उमेदवारी देखील दिली. आणि धक्कादायक विजय मिळवून दिलाच, शिवाय मैथिलीच्या लोकप्रियतेचा भाजपालाही फायदा झाला. तावडेंच्या हितचिंतकांना प्रश्न पडेल, या बदल्यात तावडेंना कोणते बक्षीस मिळेल? भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद प्रलंबित आहे. त्यांचं नाव चर्चेत आहे. आणि कदाचित गडकरी नंतर विनोद तावडेंचा अध्यक्ष म्हणून नंबर लागला तर?
विनोद तावडे यांनी मैथिली ठाकूर यांचा पक्ष प्रवेशाचा जसा निर्णय घेतला तसेच रणनीती म्हणून प्रशांत किशोर यांच्या टीकेला महत्व दिले नाही. नाव न घेता पीकेंच्या रणनीतीला अनुल्लेखाने मारले. आणि पीकेंचा जनसुराज पक्ष भोपळा न फोडताही महागठबंधनचा काटा बनला. तसेच बिहारचा पुढील सीएम कोण या चर्चेची हवा काढून टाकली. विरोधकांचा डाव होता नीतीशकुमार यांचे नाव सीएमसाठी जाहीर व्हावे. ते टाळले. जंगल राज आणि विकास हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आणि मराठमोळ्या शिलेदाराने एनडीएला सुपर डुपर यश मिळवून दिले. आता नजीकच्या काळात विनोद तावडे यांना कोणती नवी जबाबदारी मिळते पाहू या!
What's Your Reaction?