संघाचं योगदान भारताला विश्वगुरू बनवणे!
प.पू.सरसंघचालक मा.डॉ.मोहनजी भागवत यांचे संघ शताब्दीनिमित्त नवी दिल्लीत तीन दिवस व्याख्यान; "शंभर वर्ष की संघयात्रा, नये क्षितिज" या विषयावर मंगळवारी पहिले पुष्प गुंफले

(विजयकुमार पिसे)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश काय? असा प्रश्न अनेकजण आजही उपस्थित करतात. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली. पण जगात इतके देश आहेत, परंतु मानवता एक आहे. संघाच्या निर्मितीचा उद्देश भारत आहे, संघाच्या कार्याचा उद्देश भारत आहे. आणि संघाचं योगदान भारताला विश्वगुरू बनवण्यात आहे, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे प.पू.सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
संघ शताब्दीनिमित्त सरसंघचालकांचे नवी दिल्लीत तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन केले होते. "शंभर वर्ष की संघयात्रा नये क्षितिज..." या विषयावर मंगळवारी पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले, आपल्याला अशा नायकाची आवश्यकता आहे, जो शुद्ध चारित्र्याचा असेल, जो समाजाशी सतत संपर्कात असेल, ज्यावर समाजाचा विश्वास असेल, जो समाजासाठी आपले जीवन आणि मृत्यूचं बलिदान देण्यास तयार असेल! बुधवारी भविष्यात संघासाठी नवीन क्षितिजे काय असतील, यावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश काय? याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अनेक चर्चा होत असतात, पण माझ्या असं लक्षात आलं की संघाबाबत जी माहिती आहे ती खूप कमी प्रमाणात आहे, तसेच जी माहिती उपलब्ध आहे त्यातील बरीच माहिती ही तथ्याला धरून नाही, त्यामुळे आपण आपल्याकडून संघाबद्दल लोकांना खरी आणि योग्य माहिती दिली पाहिजे, संघावर जी चर्चा होते ती धारणांवर आधारित न राहाता तथ्यांवर आधारित असावी. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात इतके देश आहेत, परंतु मानवता एक आहे. संघाच्या निर्मितीचा उद्देश भारत आहे, संघाच्या कार्याचा उद्देश भारत आहे. आणि संघाचं योगदान भारताला विश्वगुरू बनवण्यात आहे. डॉ. हेडगेवार जन्मजात देशभक्त होते. ही आवड त्यांच्या हृदयात लहानपणापासूनच होती. रवींद्रनाथ ठाकूर यांनी स्पष्टपणे त्या संदर्भात लिहिले आहे की, डॉ. हेडगेवार यांनी एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्यानंतर त्यावर चर्चा केली. संघाची औपचारिक घोषणा 1925 ला झाली. मात्र संघाची बीज प्रत्यक्षात त्याआधीच अनेक वर्षांपूर्वीच पेरली गेली होती.
संघ 100 वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे, संघ चालवण्याचा उद्देश काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का सुरू झाला? त्याच्या मार्गात किती अडथळे आले? सर्व परिस्थितींना तोंड देऊनही स्वयंसेवकांनी आपलं कार्य सुरूच ठेवून संघाला पुढे का नेले? 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ते नवीन योजनांबद्दल का बोलत आहेत? जर याचे उत्तर एका वाक्यात द्यायचे असेल तर ते म्हणजे संघाच्या प्रार्थनेच्या शेवटी, आपण दररोज म्हणतो भारत माता की जय, हा आपला देश आहे, त्या देशाचा जयजयकार केला पाहिजे, देशाला जगात अग्रगण्य स्थान मिळाले पाहिजे. भारत देश हाच संघ चालवण्याचे मुख्य कारण आहे. भारताला विश्वगुरू करण्यातच संघाची सार्थकता आहे.
What's Your Reaction?






