आडम मास्तरांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार!
‘रे नगर’ सभासदांना स्वयंरोजगार व त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देणार कॉ.आडम मास्तर यांची ग्वाही

सोलापूर : सोलापूरातील असंख्य बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी आणि शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरातील ३० हजार असंघटीत कामगारांना पंतप्रधान आवास योजना शहर भाग अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबवून रे नगर च्या माध्यमातून सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे दि. १९ जानेवारी २०२४ रोजी देशाचे मा. पंतप्रधान दस्तुरखुद्द नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले. हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरला. उर्वरित १५ हजार घरे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वितरीत करण्याचे युद्धपातळीवर काम चालू आहे. रे नगर ही स्वतंत्र नगरपालिका होणार असून या नगरपालिकेत लागणारा मनुष्यबळ व कर्मचारी हे लाभार्थ्यांचे सुशिक्षित तरुण मुले असतील आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध स्वयंरोजगार योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल असे प्रयोजन तयार असून आगामी विधान सभेत भरघोस मताधिक्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठवावे. असे भावनिक आवाहन रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.
रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सभासदांचा निर्धार मेळावा रे नगरचे चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले कि, पूर्वी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ४.५ लाख रुपये अनुदान होते. केंद्रात भाजपा प्रणित मोदी सरकार सत्तेत येताच अनुदानाची मर्यादा घटीत केली. यामुळे रे नगर च्या लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे २.५ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. परंतु सध्या राष्ट्रीयकृत बँकामार्फत लाभार्थ्यांना २ लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागत आहे. अशा प्रकारे राष्ट्रीयकृत बँकामार्फत २५० कोटी रुपये कर्ज उपलब्ध झाले असून उर्वरित ३५० कोटी रुपये कर्जाचे वितरण प्रस्तावित आहे. एकंदर हा कर्जाचा बोजा हातावर पोट असणाऱ्या व महिनाकाठी ७-८ हजार रुपये कमावणाऱ्या लाभार्थ्यांना पेलणारे नाही. यांना बँकेच्या व्याजासह कर्जमुक्त करून वाढीव २ लाख रुपये अनुदान मिळणे अत्यावश्यक अनिवार्य आहे. या वसाहतीत पाणी, अंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था झालेली असून पायाभूत व मुलभूत सोयीसुविधांपैकी शहराच्या धर्तीवर उत्तम दर्जाचे अंतर्गत व मुख्य रस्त्यांसाठी १२५ कोटी रुपयांची गरज आहे. आज दिवसेंदिवस विजेचे दर प्रचंड वाढत असून लाभार्थ्यांना अत्यल्प दरात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी नाममात्र दरात सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीची आवश्यकता आहे. हि वसाहत सर्व सोयीसुविधांयुक्त एक नवे आदर्श शहर बनवून जगापुढे सादर करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहोत. या परिश्रमाला यश येण्यासाठी सभासदांनी भक्कमपणे लढ्याच्या मैदानात उतरले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात रे नगर चे चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी म्हणाल्या की, सभासदांचा निर्धार मेळावा घेण्यासाठी तब्बल १५ दिवसापासून संस्थेचे सर्व कर्मचारी, लढाऊ कार्यकर्ते यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन प्रचार व प्रसार करण्यात आला. सध्याची राजकीय परिस्थिती आणि संस्थेपुढील आव्हाने सभासदांना पटवून सांगण्यात आले. म्हणूनच या मेळाव्यास महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित राहिले. त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले. संस्थेसोबत असणारे ऋणानुबंध असेच विकसित व्हावे व येणाऱ्या विधान सभेत रे नगरच्या सर्व सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध होण्याकरिता सभासदांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले व संस्थेच्या वतीने १ लाख रुपये निवडणूक निधी आडम मास्तर यांच्या हाती सुपूर्द केले.
यावेळी व्यासपीठावर सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख, रे नगरचे सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, प्रा.अब्राहम कुमार, कॉ. रंगप्पा मरेड्डी, दाऊद शेख, विक्रम कलबुर्गी, लक्ष्मण माळी, नरेश दुगाणे, छगन कलबुर्गी, म.हनीफ सातखेड, असिफ पठाण, आदींची उपस्थिती होती.
या मेळाव्याची सुरुवात अब्दुल रसूल कुरबान हुसेन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक रे नगर फेडरेशनचे सेक्रेटरी कॉ. युसुफ शेख (मेजर) तर सूत्रसंचालन म.हनीफ सातखेड यांनी केले.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी जावेद सगरी, बजरंग गायकवाड, म.युसुफ शेख, राजेश काशीद, अमोल काशीद, अस्लम शेख, अमीन शेख, जुबेर सगरी, हुसेन शेख, अकिल शेख, नितीन कोळेकर, इब्राहीम मुल्ला, अमिना शेख आदींनीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






