अनेक भावी आमदारांचे लॉन्चिंग
नुलु पुन्नम श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव मिरवणुकीत तेलगू भाषिक बांधवांचे शक्ती प्रदर्शन

सोलापूर: श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव मिरवणुकीत सोमवारी तेलगू भाषिक बांधवांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यंदाच्या वर्षी शतक महोत्सवी पद्मशाली बांधवांची ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. सोलापूर शहर हे मिरवणुकीचे शहर म्हणून आता ओळखले जाऊ लागले असून सर्वदूर ख्याती पसरली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी नुलू पुन्नमी श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव मिरवणूक निमित्त सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात पहाटेपासूनच पद्मशाली बांधवांची गर्दी ओसंडून वाहत होती. ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फुलमारी यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे साडेचार वाजता श्री मूर्तीची पूजा सुरेश फलमारी व अन्य मान्यवर यांच्या हस्ते पडला. सकाळी ११ वाजता पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ झाला. यावेळी ज्ञातीचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सिद्धेश्वर पेठ मार्कंडेय मंदिरापासून निघालेली मिरवणूक सायंकाळी जगदंबा चौक इथे आल्यानंतर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. जमखंडी पूल ते कालिका मंदिर यादरम्यान ३० पेक्षा अधिक उत्सव मंडळ आणि तरुण कार्यकर्ते डॉल्बीच्या तालावर थिरकत होते. काही उत्सव मंडळांनी मार्कंडेय मंदिर व भगवान शंकर आणि श्री मार्कंडेय महामुनी यांचे देखावे सादर केले होते. काही मंडळांचे सजीव देखावे ही लक्ष वेधून घेत होते. पद्मशाली चौक ते दत्तनगर मार्कंडेय रुग्णालय, दाजी पेठ या मार्गावरही मोठ्या संख्येने उत्सव मंडळ कार्यकर्ते भाविक यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात डिजिटल फलकांचीही रांग लागली होती. या डिजिटल फलकांवर भावी आमदार आणि त्यांची छबी झळकत होती. यंदाचे हे १०१ वे वर्ष होते. आणखी दोन महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर अनेक भावी आमदार या मिरवणुकीत डिजिटल आणि डॉल्बीचे प्रदर्शन करत झळकले. शहर मध्य मतदार संघ केंद्रित हा , रथोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात पार पडला. सर्वश्री महेश कोठे, देवेंद्र कोठे, श्रीनिवास संगा, अंबादास गोरंटला, मनीष काळजे, सोमेश्वर वैद्य, शिवाजी सावंत, ज्योती वाघमारे, कमटम, वल्याळ, भंडारे, आडम, गुडेवार, कोंडूर, कोगनुरे ही मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहेत. त्यामुळेे मिरवणुकीनिमित्त इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या नेत्याला लॉन्चिंग केले.
अंबादास गोरंटला मित्रपरिवार यांनी शिवराम चौकात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. त्याचा लाभ अनेकांंनी घेतला. पद्मशाली समाजाचा हा रथोत्सव सोहळा असला तरी यंदाच्या वर्षी तेलगू भाषिक अन्य समाज बांधवांचाही मिरवणुकीत सहभाग लक्षणीय होता. एका अर्थी यंदाच्या, निवडणुकीत उमेदवारी केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर तेलुगू भाषिक आम्ही सारे एक आहोत, असा संदेश देत इच्छुक उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले. सायंकाळी सात नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. तरी देखील उत्सव मंडळ कार्यकर्ते व भाविक यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
What's Your Reaction?






