मविआचा सोलापुरी पॅटर्न

दक्षिणेत काँग्रेसचा पंजा गायब, आता वाजतेय पिपाणी, एक़ाकी मशाल

Nov 8, 2024 - 19:33
 0  320
मविआचा सोलापुरी पॅटर्न

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : महाविकास आघाडीच्या एकीकरणाला छेद दिला उबाठाचा हेकेखोरपणा. त्यामुळे सोलापूर दक्षिण सोलापुरात काँग्रेसचा पंजा गायब झाला, तुतारीची झाली पिपाणी आणि सेनेची मशाल एकाकी पडली आहे. त्यामुळे आघाडीच्या या *"सोलापुरी पॅटर्न"* चा फटका त्यांच्याच उमेदवारांना बसला तर आश्‍चर्य वाटू नये. शिवसेनेच्या सांगली पॅटर्नवर दक्षिण सोलापुरात कडी झाली असून त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे (सुशीलकुमार शिंदे) प्रतिनिधित्व केेलेल्या दक्षिणमधून हाताचा पंजा गायब झाला. इतकेच नव्हे तर काँग्रेसकडे असलेले तुल्यबळ उमेदवार दिलीप माने यांनी जे वादळ उभे केले, वातावरण तापवले, त्याचा (पवार-शिंदे-राऊत) कूटनीतीने डाव साधला. ही कुटनीती कुणाचा घात करेल? (दक्षिण सोलापुरात ठाकरे सेनेचा सांगली पॅटर्न)चा लक्ष्यवेध 24 सप्टेंंबर रोजी घेतला होता. आणि अंतिमत: तेच झाले. उबाठा सेनेची उमेदवारी अमर पाटील यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे दिलीप माने आक्रमक झाले, आणि पुढे काय झाले, हे 23 नोव्हेंबरच्या निकालात समजेल

आता जिल्ह्यात दक्षिण सोलापूरमुळे "सोलापुरी पॅटर्न"ची चर्चा जोरात सुरू आहे. कारण दक्षिणचे हे लोण सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, मोहोळ, सांगोला, पंढरपूर, माढा, करमाळा पर्यंत पसरले आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतली तरी, मविआच्या उमेदवारांपासून बंडखोरांनी अंतर ठेवले आहे. दक्षिण सोलापुरात काँग्रेसकडे तगड्या उमेदवारांची मागणी होती. दिलीप माने यांची तलवार म्यान करविली, ते बाबा मिस्त्रींच्या बाबत काँग्रेसला करता आले नाही. गतवेळी बाबा मिस्त्री यांनी भाजपाच्या सुभाषबापूंना चिवट झुंज दिली होती, आता बाबा मिस्त्री त्वेषाने "प्रहार" करण्याच्या इराद्यानेच उतरले आहेत. धर्मराज काडादी यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आणि मुलाखत दिली शरद पवारांकडे. हाताचा पंजा घात करेेल म्हणून तुतारी हाती घेण्याचा त्यांचा इरादा. काडादींमुळे धर्मसंंकटात कोण? (हा नॅरेटिव्ह 18 सप्टेंबर: लक्ष्यवेधने चालवला. आणि पुढे याचीही प्रचिती आली.) आता काडादींना काँग्रेस व शरद पवार गटाचा पाठिंबा आहे, असे सांगितले जाते. हे कितपत. यासाठीच प्रतीक्षा आहे. 

  एका रात्रीत भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले महादेव कोगनुरे यांचीही घोर निराशा झाली. खा. महास्वामींच्या कोट्यातून लाभार्थी झालेले काँग्रेसचे कोगनुरे यांनी चक्क मनसेचे "मौल्यवान" इंजिन घेतले, हे आश्‍चर्यच. त्यासाठीचे *मोल?* किती. संतोष पवार यांनी बारामतीचा "मार्ग" पत्करला, आणि बारामतीच्या धर्तीवर दक्षिण सोलापूरचा विकास करणार, अशी शपथ शरद पवारांच्या साक्षीने घेतली. पण या पवारांना कसा *मार्ग?* पवारांनी दावला, हे अजून संतोषजींना कळाले नसेल. काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेस पक्षाचे तौफीक शेख, मंद्रुपचे अप्पाराव कोरे सावकार आणि भंडारकवठेचे बसवराज बगले हे काँग्रेसीजण दक्षिण सोलापूरच्या आखाड्यात आहेतच. मविआचा सोलापुरी पॅटर्न कोणाला *धर्म* संकटात टाकणार की *मंगल* करणार. यासाठीचा कौल 20 नोव्हेंबरला.

(क्रमश:)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow