Gen- Z देशविरोधाचं लेबल नको, पण संवाद हवा!
आमच्या पिढीपेक्षा देशभक्ती जेन झी मध्ये अधिक; आंदोलन करणे गैर नाही, पण त्याचा उपयोग विभाजनासाठी नको : सरसंघचालक
(विजयकुमार पिसे)
Gen- Zतरुण देशविरोधी नाहीत, त्यांना तसे लेबल लावू नका, पण त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे, तरच प्रश्न सुटतील. आमच्या पिढीपेक्षा त्यांच्यात देशभक्ती अधिक आहे. आंदोलन करणे गैर नाही, मात्र त्याचा उपयोग विभाजनासाठी झाला नाही पाहिजे, असे विचार रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ.मोेहन जी भागवत यांनी व्यक्त केले.
डॉ.भागवत यांनी नव्या पिढीची स्तुती केली. जनरेशन- Z तरुणांविषयी त्यांनी यावेळी महत्त्वाचे विधान केले. Gen- Z मधील तरुणांना देशविरोधी, असे लेबल लावू नये, ते आपलेच लोक आणि देशाची पुढची पिढी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकार आणि तरुणांमध्ये अधिक संवाद होण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे गुरुवारी ६ रोजी संवाद कार्यक्रम झाला. Gen- Zच्या आंदोलनांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ.भागवत यांनी ही भूमिका मांडली. तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, Gen- Z देशविरोधी नाहीत. ते आपलेच लोक आहेत. ती आपल्या देशाची पुढची पिढी आहे.
कोणत्याही मतभेदांपूर्वी परस्परांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. नाते निर्माण झाले की संवाद शक्य होतो आणि त्यातून दोन्ही बाजूंना एकमेकांच्या भावना आणि अडचणी समजून घेता येतात. संघर्षाऐवजी संवादाची गरज असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, मी यापूर्वीही संवाद करण्याबद्दल बोललो आहे. आधी नाते तयार झाले पाहिजे. नाते असेल तर संवाद होतो. आपण त्यांची चिंता समजून घेतो आणि ते आपली चिंता समजून घेतात. असेच व्हायला हवे, याकडेही सरसंघचालक डॉ.भागवत यांनी लक्ष वेधले.
Gen-Z आणि Gen- alpha या नव्या पिढीबाबत बोलताना भागवत यांनी त्यांच्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले. ही पिढी आधीच्या पिढीपेक्षा कमी बांधिलकीची आहे, हा समज त्यांनी फेटाळून लावला. मला जेव्हा जेव्हा या पिढीबद्दल विचारले गेले, तेव्हा मी एकच गोष्ट सांगितली आहे आणि आजही तीच सांगतो. माझ्या मते Gen- Z आणि Gen- alpha ही नवी पिढी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक आहे. त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना अधिक आहे आणि समाजसेवेची जाणीवही अधिक आहे.
आंदोलन करणार्या तरुणांना आणि त्यांच्या मागण्या मांडल्यामुळे त्यांना देशविरोधी ठरवले जाते, याविषयी सरसंघचालक डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले की, तरुणांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांना दूर लोटण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे हीच योग्य दिशा असल्याचे नमूद करून आंदोलन करणे गैर नाही, पण त्याचा हेतू विभाजनाच्या दिशेने जाणार नाही, हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
What's Your Reaction?