मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन पंढरपूर,सोलापूरमार्गे धावणार
मुंबई ते सोलापूर दीड तासांत, पुणे ते सोलापूर फक्त ४५ते ५५ मिनिटांत,सोलापूर जवळ स्वतंत्र बुलेट ट्रेन स्टेशन
(विजयकुमार पिसे)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सोलापूर आणि पंढरपूरला गिफ्ट देणार असून मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा प्राथमिक मार्ग समोर आला आहे. पुणे, पंढरपूर आणि सोलापूरमार्गे हायस्पीड रेल्वे धावण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला तर मुंबई ते सोलापूर दीड तासांत, पुणे ते सोलापूर फक्त ४५ते ५५ मिनिटांत या बुलेट ट्रेनने पार होईल
अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी आणि विकाराबादमार्गे धावणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. तोच हायस्पीड कॉरिडॉरचा विस्तार पुढे पुणे आणि हैदराबादपर्यंत करण्याची योजना आहे. यामुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या४८ मिनिटांत होईल. मुंबई ते सोलापूर प्रवास दीड तासांत होऊ शकतो. पुणे ते सोलापूर अवघ्या ४५ ते ५५ मिनिटांत पार होईल. तर पुणे ते हैदराबाद अंतर दोन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वेमुळे पंढरपूर आणि सोलापूरला मोठा फायदा होणार आहे. पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. आणि सोलापूरच्या औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रालाही याचा लाभ होईल.
सोलापूरजवळ बुलेट ट्रेन स्टेशन
विशेष म्हणजे सोलापूरजवळ स्वतंत्र बुलेट ट्रेन स्टेशन उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात नव्या विकास प्रकल्पांना गती मिळू शकते. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे सोलापूर आणि पंढरपूर हे दोन्ही भाग राज्याच्या विकास नकाशावर अधिक ठळकपणे समोर येण्याची चिन्हे आहेत. महत्वाची बाब म्हणजे कोणीही लोकप्रतिनिधी व नेत्यांनी या बुलेट ट्रेनची मागणी केलेली नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे श्रेयवाद निकाली आहे.
What's Your Reaction?