डॉ. सूर्यप्रकाश कोठेंचे नितीन गडकरींना साकडे; महामार्ग सुरक्षा व ट्रॉमा केअर हॉस्पिटलची मागणी
अपघातग्रस्तांसाठी ‘गोल्डन अवर’ उपचार सुविधा उभारण्यावर भर; गडकरींकडून सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर : सोलापुरातील प्रथितयश डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्ग सुरक्षा व ट्रॉमा केअर हॉस्पिटलसाठी महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. या मागण्यांची दखल गडकरी यांनी घेतली असून श्री मोदी आणि आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
अपघातानंतरची पहिली एक तासाची वेळ जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर डॉ.कोठे यांनी महामार्गांलगत सक्षम आणि तातडीच्या आरोग्य सुविधांची आवश्यकता अधोरेखीत केली. राष्ट्रीय महामार्गांवर अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी, प्रत्येक ५९ ते १०० किलोमीटर अंतरावर हायवे इमर्जन्सी मेडिकल युनिट सुरू करणे,यंत्रणेसह सुसज्ज अॅम्बुलन्स नेटवर्क, खासगी व शासकीय रुग्णालयांचा महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय, अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे या मागण्या गडकरींकडे डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी केल्या आहेत. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निवेदनामध्ये मांडलेले विषय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहोचवून लवकर मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. यावेळी डॉ.संजय मंटाळे, डॉ.सचिन बोंगरगे उपस्थित होते.
What's Your Reaction?