1400 कोटींची पा.पु.योेजना आणणार,पण करवाढ नाही : कोंड्याल
भाजपाध्यक्ष,उपमहापौर,सभागृहनेते,स्थायी सभापतींच्या साक्षीने महापौर कोंड्याल यांचा दावा
सोलापूर : शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित 1400 कोटी रुपयांची महत्वाकांक्षी योजना आाणण्याचे निश्चित आहे. पण यामुळे सोलापूरकरांवर कोणतीही करवाढ किंवा दरवाढ लादली जाणार नाही, असा दावा महापौर विनायक कोंड्याल यांनी केला. महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव तातडीने पाठविल्याने तो सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले. शुक्रवारी तातडीने बोलावण्यात आलेल्या पत्र परिषदेस भाजपाध्यक्षा तडवळकर,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,सभागृहनेते नरेंद्र काळे,स्थायी समिती सभापती चाकोते उपस्थित होते.
दरम्यान आज 1400 कोटी पा.पु.योजना व करदरसंदर्भात माहिती घेण्यासाठी आ. विजयकुमार देशमुख आणि आ.सुभाष देशमुख आयुक्त यांच्या भेटीसाठी महापालिकेत आले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची भागम् भाग.. झाल्याचे दिसून आले. दरम्यान शनिवारी पार्टी मिटींग होण्याची शक्यता असून या प्रस्तावाविषयी निर्णायक भूमिका घेतली जाईल, असे सांगण्यात आले.
तातडीने बोलावलेल्या पत्र परिषदेत महापौर कोंड्याल यांनी प्रकल्पाबाबत करवाढीचे समज, गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शहरवासीयांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाणार नाही. प्रकल्पातील दर व अटी निश्चित करण्यासाठी अभ्यास केला जाईल. त्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. सुमारे 1378.42 कोटींच्या पा.पु.प्रकल्पासाठी 50 टक्के निधी जागतिक बँक, 25 टक्के केंद्र शासन, आणि उर्वरित 25 टक्के हिस्सा महापालिकेला उचलावा लागणार आहे. या 25 टक्के हिश्श्यासाठीच करवाढ होईल, अशी चर्चा आहे. त्या अनुषंगाने महापौैरांनी स्पष्टीकरण करताना करवाढ होणार नाही, असा दावा यावेळी केला.
What's Your Reaction?