भाजपायींच्या मुळावर ऑपरेशन लोटस!
जुन्या कार्यकर्त्यांचा घात करण्यासाठी घाऊक गेटकेन काँग्रेसी घुसखोरी
(विजयकुमार पिसे)
कर्नाटकातून ऑपरेशन लोटस सुरू झाले, भाजपाच्या दक्षिण दिग्विजयासाठी. मिशन यशस्वी झाले. गल्ली ते दिल्लीपर्यंत लोटस व्यापले आहे. महाराष्ट्रात विशेषत: सोलापूर जिल्ह्यात त्याची कितपत आवश्यकता आहे, हे संशयास्पद वाटते. पक्षातीलच भाजपायींच्या मुळावर घाव घालण्यासाठी गेटकेन घुसखोरी असल्याचे लक्षात आल्यामुळेच दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांनी एल्गार केला. ऐन दिवाळीत भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन स्वच्छ प्रतिमेच्या पक्षाला लांच्छन नव्हे?
काँग्रेसी संस्कृतीमधून आलेल्या गेटकेन नेत्यांचा हा डाव उधळला गेला तरच कमळाचे (अर्थात भाजपाचे) पावित्र्य टिकेल. अन्यथा आज सर्वत्र जी टीका होते, भाजपा म्हणजे सुपर वॉशिंग मशिन. बाहेरची घाण स्वच्छ, नव्हे पोसण्याचे पाप भाजपाच्या माथी मारण्याचा प्रकार. हे निंदनीय आणि निषेधार्हच.. म्हणून सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर दिवाळीत शिमगा केला. यावर पालकमंत्र्यांचे उत्तर धक्कादायक आहे. पक्ष प्रवेशाचा निर्णय शहर कार्यालयात नव्हे, प्रदेश कार्यालयात होेतो. मुख्यमंत्री,प्रदेशाध्यक्ष त्याबाबत निर्णय घेतात. शहर कार्यालयासमोर आंदोलन करून काय साध्य केले? असा पालकमंत्र्यांचा प्रश्न. म्हणजे कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार.
सोलापूरची लोकसभा काँग्रेसला आंदण म्हणून दिली. त्यावर उपाय म्हणून काँग्रेसी संस्कृतीच घाऊक आयात हे त्याहून घातक. ऑपरेशन लोटस म्हणजे भाजपात काँग्रेस संस्कृतीचा परिपोष करणे होय. विशेष म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा, शिस्त, विचार शिकविणारे नेते काँग्रेस संस्कृतीत काही पिढ्या गेलेले गेटकेन मंडळी, हे त्याहून मोठे आश्चर्य. म्हणून आ.सुभाष देशमुख म्हणालेत, भाजपा काँग्रेसमय होण्याची भीती.
गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये अनेक घाऊक मंडळींचे रातोरात गेटकेन झाले. यापैक़ी बहुतेकजण प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात सक्रिय होतेच, तर काही जण विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकलेले. साखर कारखान्याच्या चिमणीचे समर्थक. विशेष म्हणजे असे काही आता पक्षाचे पदाधिक़ारी म्हणून कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देत आहेत. हे ऑपरेशन लोटस करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकहाती जिंकून आणू अशा अविभार्वात कोण असतील तर तो गोड गैरसमज ठरेल. ऑपरेशन लोटस म्हणजे पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करून आपला डाव साधणे होय. भाजपायींचा घात करण्यासाठीचा खटाटोप.
सोलापूर कृ.उ.बाजार समिती निवडणुकीत गेटकेनची पेरणी झाली. दावा होता, बाजार समितीवर सत्ता भाजपाची आणि नंतर सभापती कोण? म्हणजे आधी पदांचे, स्वच्छतेचे सोहळे आणि पुढे तेच खरे कारभारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही गेटकेनलाच अधिक वाटा, कार्यकर्त्यांवर वरवंटा!
*जाता जाता ... ऑपरेशन लोटस सोलापूर जिल्ह्यातील ठराविक काही मतदारसंघातच आणि काही तालुक्यातच योजनापूर्वक सुरू आहे. शेजारच्या सातारा जिल्ह्यात, समर्थांच्या नगरीत, असे काही कानावर आले का?
What's Your Reaction?