हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा उत्साहात

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम : भारतमातेचा अन् छत्रपती श्री शिवरायांचा झाला जयजयकार

Aug 16, 2024 - 14:09
 0  23
हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा उत्साहात
हिंदवी स्वराज्य निर्माण

सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या पदयात्रेत परमपवित्र भारतमातेचा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जयजयकार तरुणांनी केला.

दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गावोगावी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात येते. 

सोलापूर महानगरपालिकेतील शासकीय झेंडावंदनानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळून या पदयात्रेस प्रारंभ झाला. पूर्व विभाग सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. यानंतर पांढरे शुभ्र कपडे आणि वारकरी टोपी परिधान केलेल्या अन् कमरेला भगवा शेला बांधलेल्या तरुणांनी पदयात्रेस प्रारंभ केला. 'पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय', 'धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय', 'भारतमाता की जय', 'हिंदू धर्म की जय' अशा घोषणा देत, राष्ट्रभक्तीपर गीते म्हणत ही पदयात्रा निघाली. सोलापूर महानगरपालिकेजवळून सुरू झालेली ही पदयात्रा चार हुतात्मा पुतळा, सरस्वती चौक, जिल्हा मध्यवर्ती बँक, आझाद हिंद चौक, चौपाड श्री विठ्ठल मंदिर, शिवस्मारक, भागवत चित्रपटगृहमार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर विसर्जित झाली. या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी केले. सामूहिक ध्येयमंत्राने पदयात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow