सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत निंबाळ येथील आश्रमात दाखल, उद्या सोलापुरात येणार!

गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरात 'उद्योगवर्धिनी की सेवाव्रती' पुस्तकाचे सरसंघचालक यांच्या हस्ते प्रकाशन आणि परिवार उत्सव कार्यक्रम

Jul 16, 2025 - 14:26
 0  414
सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत निंबाळ येथील आश्रमात दाखल, उद्या सोलापुरात येणार!

(विजयकुमार पिसे)

प.पू.सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत नियोजित प्रवासानुसार काल मंगळवारी सायंकाळी विजयपूर जिल्ह्यातील अध्यात्मिक गुरूदेव रानडे यांच्या निंबाळ येथील आश्रमात दाखल झाले आहेत. दोन दिवसीय वास्तवानंतर उद्या गुरुवारी सोलापुरात आगमन होणार असून यावेळी उद्योगवर्धिनी संस्थेला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल परिवार उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योगवर्धिनी की सेवाव्रती पुस्तकाचे प्रकाशन डॉ.भागवत यांच्या हस्ते होणार आहे.

    उद्योगवर्धिनीच्या कार्यक्रमासंदर्भात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पू. सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते 'उद्योगवर्धिनी की सेवाव्रती' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्व. नानाजी देशमुख यांच्या हस्ते 24 वर्षांपूर्वी उद्योगवर्धिनी संस्थेचे नामकरण झाले. यानंतर तीन वर्षांनी उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना झाली. मागील 24 वर्षांत हजारो महिलांनी विविध संकटांवर मात करत समृद्ध आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योगवर्धिनी सोबत केला आहे. उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई, खाद्य पदार्थ, स्वयंपाक आदींच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यात उद्योगवर्धिनीला यश आले आहे. यातून शेकडो उद्योजिका घडल्या आहेत, असे चौहान यांनी सांगितले.

    गुरुवारी सकाळी सोलापुरात आगमन झाल्यानंतर तत्पूर्वी उद्योगवर्धिनीच्या कार्यालयास सरसंघचालक भेट देतील. येथे सेवाव्रती महिलांशी संवाद साधणार आहेत. हुतात्मा स्मृती मंदिरात स.10 वाजता प्रख्यात लेखिका नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर संपादित 'उद्योगवर्धिनी की सेवाव्रती' या पुस्तकाचे प्रकाशन व उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित अखंड यात्रा माहितीपटाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त परिवार उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

    हुतात्मा स्मृती मंदिरातील कार्यक्रम उद्योगवर्धिनीच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून त्यांना निमंत्रण प्रवेशिका देण्यात आल्या आहेत, असे उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow