हिंदू धर्मरक्षक गुरू तेगबहादुर, आज बलिदानाचे ३५० वर्ष
हिंदू धर्मरक्षक गुरू तेगबहादुर आज बलिदानाचे ३५० वर्ष
शीखांचे नववे गुरू तेगबहादुर हिंदू धर्मरक्षक अशी इतिहासात नोंद आहे. त्यांच्या बलिदानाला आज २४ नोव्हेंबर रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूर अत्याचारी औरंगजेबने अनन्वित छळ करून मारले. शीखांचे नववे गुरू तेगबहादूरांचाही छळ करून जाहीरपणे त्यांचा शिरच्छेद केेला. छत्रपती संभाजी महाराज आणि गुरू तेगबहादूर दोघेही शूरवीर,पराक्रमी आणि धर्माभिमानी. हिंदू धर्म रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीस शत शत नमन।
गुरू तेगबहादूर यांच्या शिष्यांचे बलिदान देखील अंगावर रोमांच आणणारे आहेत. शिष्य भाई मतीदास यांना दोन खांबांना बांधून करवतीने चिरले. भाई दयालदास यांना उकळत्या तेलात उभे करून जाळले. भाई सतीदास यांना कापसाच्या गादीत गुंडाळून जीवंत जाळले. या तीनही घटना क्रूर आणि संतापजनक होत्या. औरंगजेबाच्या क्रूरतेचा कहर म्हणजे या तीनही घटना जाहीरपणे केल्या.
तीन शिष्यांसह गुरू तेगबहादूर यांच्या बलिदानानंतरही क्रूरकर्मा औरंजेबाचा छळवाद संपला नाही. गुरू तेगबहादूर यांच्या शरीराची विटंबना करण्यासाठी शरीराचे तुकडे दिल्लीच्या सीमेवरील चार दरवाजांवर लटकावण्याचे आदेश दिले. त्या दिवशी प्रचंड वादळ आले. या गोंधळात एक शिष्य लख्खी शाहने गुरूच्या शरीराची विटंबना टाळण्यासाठी गुपचूप घरी नेले आणि घरालाच आग लावली. या आगीतच गुरूच्या देहावर अंत्यसंस्कार पार पाडले.
आणखी एका शिष्याने भाई जैता दास यांनी गुरूचे शीर एका कपड्यात गुंडाळून लपवले होते. मुघलांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. शीर ताब्यात घेण्यासाठी त्या गावात दवंडी पिटवली. अन्यथा गाव जाळून टाकण्याची धमकी दिली. या दरम्यान एक वयस्कर गावकरी सैन्याला शीर देण्याची तयारी दाखवत घरामध्ये गेला. नंतर हातात शीर घेऊन त्याचा मुलगा जैता दास बाहेर आला आणि सैन्याला म्हणाला, घ्या हे शीर! धडावेगळे केलेले हे शीर होते भाई जैता दास यांच्या वडिलांचे. त्यांचे नाव दादा कुशाल सिंह दहीया. भाई जैता दास गुरू तेगबहादूर यांचे शीर/मस्तक घेऊन सुरक्षितपणे आनंदपूर साहिबला निघून गेला. तिथे गुरू तेगबहादूर यांच्या मस्तकावर अंत्यसंस्कार केले. शूरवीर पराक्रमी आणि धर्मरक्षकांच्या इतिहासामध्ये त्यागाचे हे अनोखे उदाहरण. गुरूच्या मस्तकाचे रक्षण करण्यासाठी शिष्याच्या वडिलाने बलिदान दिले. आपला इतिहास शूर वीरांचा आणि पराक्रमाचा आहे. अशा अगणित वीरांच्या स्मृतीस शत शत नमन
*वाहे गुरू॥
*विजयकुमार पिसे (संपादक),
विभाग सहमंत्री, विश्व हिंदू परिषद प.महाराष्ट्र प्रांत
What's Your Reaction?