मातृस्वरूप शक्तीच्या प्रेरणेतून उद्योगवर्धिनी सगळीकडे उभी राहिली पाहिजे: सरसंघचालक
उद्योगवर्धिनीच्या परिवार उत्सवात पू.सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांचे आवाहन

(विजयकुमार पिसे)
संघात अनेक वर्ष स्वयंसेवक काम करतात, आपले कर्तव्य म्हणून करीत राहतात, महिला तयार झाली तर पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते, ती मातृस्वरूप आहे. अशाच प्रेरणेतून उद्योगवर्धिनी सगळीकडे उभी राहिली पाहिजे, असे आवाहन प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोलापुरात केले. उद्योगवर्धिनीच्या परिवार उत्सव कार्यक्रमात डॉ.भागवत बोलत होते. वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहिली तर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
25 वर्षापूर्वी संघप्रचारक भारतरत्न स्व.नानाजी देशमुख यांच्या आशीर्वादाने उद्योगवर्धिनीचे रोपटे लावण्यात आले होते. यंदा या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून परिवार उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा संस्थेचे सल्लागार राम रेड्डी, सेवाभारतीचे अध्यक्ष तथा उद्योजक राजेश पवार, उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान आणि सचिव मेधा राजोपाध्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
दृष्टी सकारात्मक असेल तर अनेक चांगल्या गोष्टी उभ्या राहू शकतात, समाजात असा चांगुलपणा आहे. यामध्ये प्रेरणा हा कारणभाव आहे. महिला उद्धाराचे कार्य करत असल्याचा मोठेपणा पुरुषांनी बाळगू नये, असा सल्ला देताना ते म्हणाले, महिला जे काम करू शकतात ते पुरुष करू शकत नाहीत. त्यामुळे महिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करण्याची मोकळीक द्यावी. त्यासाठी त्यांना अनिष्ट रूढींच्या जोखडातून मुक्त करावे. सामान्यांच्या असामान्य कर्तृत्वातून उद्योगवर्धिनी संस्था उभी राहिली, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
जयप्रकाश नारायण यांची आठवण : बिहारच्या दुष्काळामध्ये संघ स्वयंसेवकांनी केलेले काम पाहून जयप्रकाश नारायण भारावून गेले होते. त्यांनी दिल्लीतील संघशिबिराला भेट दिली व स्वयंसेवकांचा परिचय करून घेतला. जयप्रकाशजींनी तुमच्या कामाची प्रेरणा काय? असा प्रश्न स्वयंसेवकांना विचारला. तेव्हा स्वयंसेवकांनी समाजाचे दुःख हीच आमची प्रेरणा असे सांगितले. हा आपलेपणाच संघकार्याची प्रेरणा आहे, अशी आठवण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी यावेळी सांगितली.
परिवार उत्सवाचे औचित्य साधून उद्योगवर्धिनीवर आधारित 'अखंड यात्रा' हा माहितीपट दाखवण्यात आला. तसेच 'उद्योगवर्धिनी की सेवाव्रती' या नयनबेन जोशी लिखित आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर संपादित पुस्तकाचे प्रकाशनही सरसंघचालक डॉ.भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी प्रास्ताविकात संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी, ज्येष्ठ संघ प्रचारक नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली उद्योगवर्धिनी संस्था स्वयंसेवकांच्या मदतीने, सोलापूरकरांच्या सहकार्याने आणि महिलांच्या कष्टावर उभी राहिली आहे. पुढील काळात महिला सक्षमीकरणासाठी एक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रशासन व समाजातून सहकार्य हवे, असे आवाहन केले. संस्थेचे सल्लागार राम रेड्डी यांनी, संघर्षमय जीवन जगणार्या महिलांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचे कार्य उद्योगवर्धिनी केले, त्यामुळे आपणही या कार्यात जोडले गेलो, असे म्हणाले. उद्योग वर्धिनीत कार्यरत सेवाव्रती वासंती साळुंखे, मीनाक्षी सलगर यांनीही अनुभव कथन केले. डॉ. सुहासिनी शहा यांनी परिचय करून दिला, अपर्णा सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. माधवी रायते यांनी आभार मानले. कल्याणी पाटील आणि ऐश्वर्या सारोळकर यांनी शुध्द सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है, हे पद्य गायन केले. संस्कृती देशपांडे आणि शिल्पा जिरांकलगीकर यांच्या संपूर्ण वंदे मातरमने परिवार उत्सवाची सांगता झाली.
What's Your Reaction?






