दोन देवेंद्र; "साथ 13", विकास कामांचा "नारा"!

आयटी पार्क, नवे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 60 मीटर डीपी रोडसह शहर विकासाच्या 13 कामांसाठी आ.कोठेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे; प.महाराष्ट्रातील आमदारांची विकास कामांबाबत निर्णायक बैठक

Jul 17, 2025 - 00:26
Jul 17, 2025 - 18:42
 0  147
दोन देवेंद्र; "साथ 13", विकास कामांचा "नारा"!

(विजयकुमार पिसे) 

विकास कामांसाठी "साथ तेरा" आणि मेरा" असेल तर निश्‍चितच शतप्रतिशत त्याचा निपटारा नि:संशय! सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावे, पूर्वभागात नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, यासह शहर विकासाकरिता 13 कामांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ.देवेंद्र कोठे यांनी साकडे घातले. मुंबई येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदारांंची विकासकामांबाबत बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागण्या तत्वतः मंजूर करण्याचे संकेत दिले. "दोन देवेंद्र, यांची साथ 13," विकास कामांचा नारा!" असे समीकरण दृष्टीपथात येत आहे.   

    बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आ.देवेंद्र कोठे यांनी, सोलापुरातील बुद्धिमान तरुणांचे स्थलांतरण रोखण्याकरिता उद्योजकांनी पुढाकार घेऊन सोलापुरात आयटी पार्क सुरू करावे, पूर्वभागात कामगारांची मोठी संख्या पाहता शासनाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी, भटक्या विमुक्त जातींसाठी 40 हजार घरकुलची योजना तसेच मुंबई आणि तिरुपतीसाठी विमानसेवा या प्रमुख मागण्या केल्या. याशिवाय मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजूर केलेल्या 850 कोटींच्या पा.पु. योजनेचा कार्यारंभ आदेश काढावा, 100 ई बस, शहराच्या विकासासाठी बी/2 रद्द करावा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासन, मनपा आणि खाजगी मालकांच्या जागेवरील झोपडपट्ट्यांची पुनर्विकास योजना, यासाठी आ.कोठे यांनी शहर विकासाच्या दृष्टीने बैठकीत चर्चा केली.

     ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर स्थापित 68 लिंगांच्या परिसराचा विकास, 4 लाखांहून अधिक लोक निगडित वस्त्रोद्योगासाठी जुन्या मशिनरी अपग्रेड, त्यासाठी अपेक्षित सबसिडी, वीज सवलत व सोलर सबसिडी, आणि विशेष पॅकेज. पुणे, हैदराबाद, विजयपूर, अक्कलकोट, होटगी या प्रमुख गावांच्या रस्त्यांना जोडणारे महानगरपालिका हद्दीतील 60 मीटर अंतर्गत रिंगरोड, म.गांधी प्राणी संग्रहालय पुनर्निर्मितीसाठी 20 कोटींचा निधी, धर्मवीर संभाजी महाराज तलाव सुशोभीकरणासाठी 60 कोटींच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी या ज्वलंत मागण्यांकडेही आ.कोठे यांनी लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली. बैठकीस अन्य प्रमुख मंत्री आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते. तसेच या संदर्भात आ.देवेंद्र कोठे यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानताना सोलापूरचा विकास आता थांबणार नाही, अशी ग्वाही दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow