काही तरी वेगळं घडतंय!
घाऊक ऑपरेशन लोटसला कार्यकर्त्यांचेच आव्हान
काँग्रेसमुक्त 'भारत' स्वागतार्ह, पण काँग्रेसयुक्त 'भाजप' झालं तर? काँग्रेसमु़क्तचा अर्थ तसा नाहीच. पण काही नवागत नेत्यांना काँग्रेसमुक्तची घाई, परिणाम घाऊक ऑपरेशन लोटस! कुणाची तरी जिरवण्यासाठी.. कार्यकर्त्यांना हे खटकणार. त्यामुळे यंदा दिवाळीत एकमेकांवरच फटाके फोडण्याची खुमखुमी सुरू झाली आहे.
सांगलीत गोपीचंद वंचितकडून लोकसभा लढले. निवडणूक प्रचारात मोदींचा त्यांनी अनेकदा जाहीरपणे उध्दार केला. ते गोपीचंद आज पक्षाचे फायरबॅरण्ड आहेत. काही तरी वेगळं घडतंय. पार्टी विथ डिफरन्स.
असाच प्रकार सोलापुरात सुरू झालाय. गत लोकसभा निवडणुकीत प्रणितीताईंना खासदार करून भाजपाची (लोकसभेत आणि जमलं तर विधानसभेला) वजाबाकी करणार्या सुमारे 75 जणांची भाजपात घाऊक एन्ट्री झाली. आणि जे अनेक बडे वेटींगवर आहेत. त्यांनी जाहीरपणे पक्षप्रवेशाचा मुहूर्त जाहीर केला. त्याची प्रतिक्रिया सोमवारी सायंकाळी व्हाटस् अपवर आली. निषेध निषेध..! असा मेसेज व्हायरल झाला. भाजपा कार्यक़र्त्यांचे भाजपा कार्यालयासमोरच धरणे आंदोलन! श्रीकृष्णाच्या द्वारकेत म्हणतात की द्वारका बुडाली. की श्रीकृष्णांनी बुडवली? तेव्हा तो एकमेकांवर उठला होता.
व्हाटसअपवर कार्यकर्त्यांचा व्हायरल मेसेज सांगतो; घोटाळ्यात बुडालेल्या,जनतेची फसवणूक करणार्या कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध. निष्ठावंत भाजपायीच जर घाऊक काँग्रेसी,कलंकितांची जाहीरपणे वाच्यता करत असतील तर जनतेमध्ये, भाजपा हितचिंतक मतदारांमध्ये (विरोधी पक्षांना) अपेक्षित संदेश जाणारच. की हे काँग्रेसमुक्त भारत नाही तर काँग्रेसयुक्त भाजप आहे. विरोधकांना आयते कोलीत. कार्यकर्त्यांच्या हितासाठी, पक्षाच्या वाढीसाठी, निष्ठावंतांच्या हक्कासाठी भाजपा रस्त्यावर उतरला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या कमान सांभाळणार्या पक्षात अशी घाऊक एन्ट्री सुरू असेल तर? ऑपरेशन लोटस यासाठीच आहे? हा व्हायरल मेसेज असेही सांगतो, चला एकत्र येऊ, कार्यकर्त्यांचा आवाज दाबू देणार नाही. सत्यासाठी झुंज देऊ, जय भाजपा! भाजपा कार्यालयासमोर निष्ठावंत भाजपायींचे धरणे आंदोलन. ही दिशा की दशा? गेल्या आठवड्यात फडणवीसांच्या ताेंंडी एक बातमी होती. स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन बड्या नेत्यांचे पक्ष प्रवेश होतील. राज्यभरात असे अनेक बडे नेते आहेत. म्हणजे भाजपाच्या सुपर वॉशिंग मशिनमध्ये ते मिस्टर क्लीन!
#जाता जाता... भाजपात अनेक आगंतुक इनकमिंग नेत्यांनी, या काव्यपंक्तीमधून कार्यकर्त्यांची भावना लक्षात घ्यावी.
कार्यकर्ता भावना है, कार्यकर्ता साधना। मैं नही तुम ही निरंतर, मंत्र जपता कार्यकर्ता। कार्यकर्ता तो स्वयं ही...।
What's Your Reaction?