वकील पतीकडून पत्नीची हत्या; मारेकरी पती स्वतः पोलिसात हजर
वकील पतीकडून पत्नीची हत्या; मारेकरी पती स्वतः पोलिसात हजर

सोलापूर : शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील वसंत विहार भागात व्यवसायाने वकील पतीने 34 वर्षीय पत्नीची चाकूने वार निर्घृण हत्या केली. यानंतर स्वतः मारेकरी वकील पोलीस ठाण्यात हजर राहिला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी 18 जुलै रोजी स.11.30 च्या सुमारास घडली.
स्वराज्य विहार ब्रिजजवळ राहणाऱ्या प्रशांत रवींद्र राजहंस (वय ४४) याने आपली पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३४) हिचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत राजहंस याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतःहून हजर होऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की, पत्नी भाग्यश्री हिच्याशी भांडण झाल्याने चाकूने तिच्या गळ्यावर वार केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, भाग्यश्री जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रशांत राजहंस व्यवसायाने वकील असून, त्याने स्वतः आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक शासकीय रुग्णालयात धावून आले. तिथे त्यांनी मोठी गर्दी केली होती. खुनामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?






