अक्कलकोटचे पोलादी पुरुष माजी आ.सिद्रामप्पा पाटील यांचे निधन
अक्कलकोटचे पोलादी पुरुष माजी आ.सिद्रामप्पा पाटील यांचे निधन
सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सहकार क्षेत्रातील धुरिण सिद्रामप्पा पाटील (वय 88) यांचे गुरुवारी रात्री सोलापूरमधील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाची वार्ता कळताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते, तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत अक्कलकोट तालुक्यात भाजपाचा पाया भक्कम केला. भाजपाची संघटनात्मक उभारणी, शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. शेतकर्यांना दिलासा देणारे, त्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे खंबीर नेतृत्व, अशी त्यांची प्रतिमा होती.
त्यांचा राजकीय प्रवास गावच्या सरपंचपदापासून सुरू झाला. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग 35 वर्ष संचालक, एकवेळ उपाध्यक्ष, श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती आणि अक्कलकोटचे आमदार असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात.वयाच्या 87व्या वर्षापर्यंत त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य अखंड सुरू ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. उपचारासाठी सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचे ते पिताश्री होत.
*सुशीलकुमार शिंदे यांना शोक
सिद्रामप्पा पाटील यांच्या जाण्याने अक्कलकोट तालुक्याचे एक खंबीर, प्रामाणिक आणि शेतकरीहितवादी नेतृत्व हरपले आहे.त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते. मध्यंतरीच्या काळात ते भाजपमध्ये गेले. तरीही त्यांचे आमच्याशी सलोख्याचे संबंध होते. ते स्पष्टवक्ते होते. लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा इतक्या वयातही त्यांनी प्रचार केला. त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केली. माझ्या व माझ्या कुटुंबीयांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली............
What's Your Reaction?