भाजपाला मिळाला "नाथ"; इलेक्शन मिशन फत्ते!

ज्येष्ठ संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी महापालिका निवडणूक प्रमुख, पालकमंत्री जयकुमार गोरे प्रभारी, पक्ष संघटना आणि आमदारांची साठमारी, पक्षश्रेष्ठी ठरले भारी

Nov 6, 2025 - 00:26
 0  544
भाजपाला मिळाला "नाथ"; इलेक्शन मिशन फत्ते!

 (विजयकुमार पिसे)

मिशन इलेक्शनमध्ये ताक देखील फुंकून प्यावे लागते. सात वर्षापूर्वी (2017) सोलापूर महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला. तोच कित्ता गिरवण्यासाठी सोलापूर भाजपला "नाथ" मिळाला असून रघुनाथ कुलकर्णी यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सोलापुरातील हतबल पक्ष संघटना आणि आमदारांमध्ये वाढती साठमारी म्हणून रघुनाथ कुलकर्णी यांची मात्रा आहे. तर ग्रामीण पूर्व विभागासाठी राम सातपुते आणि पश्‍चिम विभागासाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव नक्की केले आहे. कल्याणशेट्टी आणि सातपुते म्हणजे ताटातले वाटीत!

मिशन इलेक्शनसाठी बुधवारी प्रदेश भाजपाने शहर आणि जिल्हा निवडणूक प्रमुख आणि संबंधित पालकमंत्री तेथील निवडणूक़ प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही पक्षाला ताक फुंकून प्यावे लागत आहे. कारण अलीकडच्या काळात सरकार आणि संघटना, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष आणि जनमानस यांचे संतुलन राहिलेले नाही. सोलापुरात पक्ष संघटनेत इतकी बेदिली वाढली की कशाचाच पायपोस नाही. संघटना हतबल झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर घाऊक काँग्रेसी गेटकेनमुळे भाजपचा चेहरा गमावला जात असल्याची चर्चा जनमानसात आहे. त्यामुळे भाजपाची विश्‍वासार्हता घटली आहे.

अशा नकारात्मक वातावरणात पक्षाला अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मूळचे सोलापूरकर रघुनाथ कुलकर्णी यांच्या हातात निवडणूक प्रमुख पदाची सूत्रे दिली आहेत. सोलापूऱ महापालिकेसाठी कुलकर्णी हेच आता सूत्रधार. त्यामुळे कोणत्याही आमदाराला आपल्या मतदारसंघाची आणि अस्तित्वाची भीती राहणार नाही. या पंधरा दिवसात पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जो संताप व्यक्त केला. याचा अर्थ पक्ष संघटना हतबल झाली आहे. आमदारांना आणि त्यांच्या समर्थकांनाही आपले अस्तित्व राहणार की नाही, ही अस्वस्थता पाहता कार्यकर्त्यांना तो विश्‍वास मिळवून देण्याचे कौशल्य रघुनाथ कुलकर्णी यांना पार पाडावे लागेल. संघटनमंत्री म्हणून त्यांना अनेक वर्षाचा अनुभव पाहता निश्‍चितच भाजपाला नाथ मिळाला असे मानता येईल. गतवेळी सोलापूर महापालिका निवडणुकीत रघुनाथ कुलकर्णी समन्वयक होते, जे प्रभाग "डेंजर झोन"मध्ये होते, त्या ठिकाणी कुलकर्णी यांनी जातीने लक्ष घालून "सेफ झोन"मध्ये आणले होते. यंदा देखील सोलापूर मनपाची निवडणूक भाजपासाठी "सेफ" करायची आहे, जेणेकरून विरोधक "साफ" होतील.

*फडणवीस यांचा विश्‍वास सार्थ..*

गत महापालिका निवडणुकीत फडणवीसांची सभा आसावा मैदानावर झाली. तेव्हा काही डेंजर प्रभागांची माहिती त्यांना दिल्यानंतर फडणवीस यांनी रघुनाथ कुलकर्णी यांना येथेच तळ ठोकण्यास सांगितले. त्याचे परिणाम म्हणजे महापालिका निवडणुकीत भाजपाचे मिशन फत्ते झाले. म्हणून यंदाही भाजपाला मिळाला "नाथ" असे मानता येईल.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow