पार्थ संकटात जड भारी। फडणवीस धाव घेती सत्वरी!
(सण्डे स्पेशल/विजयकुमार पिसे)
राजकारणात मिसरूड फुटलेल्या पार्थला बळेबळेच लॉन्चिंग करण्याचा बारामतीकरांचा प्रयत्न या सहा वर्षात दुसर्यांदा फसला. अन दादा भलतेच अडचणीत आले. नको त्या चक्रव्यूहात तर फसले नाहीत ना? पक्ष आणि समर्थकांना अस्वस्थ करणारे राजकीय वातावरण अधिक गढूळ झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर पार्थघोटाळ्यामुळे दादा पुरते हादरलेत, इतकेच नव्हे तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर जाण्याचीही शक्यता असून नाईलाजास्तव तडजोड हाच अंतिम पर्याय राहील
आत्याबाईंंचा जणू काही घडलेच नाही, असा पवित्रा आणि आजोबांचा चौक़शी फटाका... या सार्या घडामोडी पाहता महाभारतात कुरूक्षेत्रावरील लढाईत चक्रधारी श्रीकृष्ण उपदेश करून हतबल अर्जुनाला उपदेश देतात, तेव्हा (गीता)बोध होतो आणि खरा पिक्चर समोर येतो... त्या पृष्ठभूमीवर एका अभंगाची ओळ आठवली.. तो म्हणजे; "पार्थ/अर्जुन संकटात जड भारी, गीता सांगे हरी कुरूक्षेत्री!" तशी भूमिका देवेंद्र फडणवीस सध्या बजावत असावेत.
दादांचा 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा पृथ्वीराज बाबांमुळे अधोरेखित झाला. बाप से बेटा सवाईच्या भूमिकेत पार्थ अजीतदादांच्या पुढे आहेत, त्यांचा घोटाळा 300 कोटींचा... बाप रे। दादा, ना आगा बघतात ना पिछा। ताडताड बोलून जातात. त्यामुळे त्यांच्या अडचणीत नेहमीच ओंजळ भर पडते. दादा म्हणाले, यातलं मला काही चुकीचे चालणार नाही. हे कसं काय, असा भाबडा प्रश्न कुणाला कसा नाही पडणार? त्यावरून गेले दोन दिवस समाजमाध्यमावर कमेंटचा पाऊस पाहता जो तो पावसात भिजण्याचा आनंद घेतोय. कळा खातोय.
आत्याबाई म्हणाल्या, पार्थ असं काही करेल, असं वाटत नाही. त्याचा थेट संबंध नाही.
आजोबांनी दादांवरला जुना राग (पक्षफोडीचा) आळवला, म्हणाले, होऊ द्या एकदाची चवकशी! दादा, आत्या, आजोबा यांचे खुलासे लोक चांगलेच समजून आणि उमजून आहेत बरं.
पार्थ संकटात किती वेळा; अशी जंत्री अभ्यासली. सहा सात वर्षापूर्वी म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आजोबांची इच्छा नसताना, दादांनी पार्थला मावळात/प.महाराष्ट्र/कोकणात झुंजविले. आणि वाघाच्या बारणेंनी मैदान मारले. सांप्रतकाळी दादांचा बहुतेक प्रचार दौरा मावळातच झाला. गावागावात, पाड्यांवर, वाड्या,वस्त्यांवर पार्थसाठी दादा तळ ठोकून होते. अनेक घड्याळजी बारामतीनंतर मावळातच गजर वाजवत राहिले. विरोधकांना खिजवत म्हणायचे, आता वाजले की १२! पण मावळकरांनी पार्थचे वाजवले बारा. तेव्हा बारामती लोकसभा जिंकण्याचा मोदी,शाहा यांचा "पण" होता. साहेबांनी कन्येसाठी पहिल्यांदाचा भरपूर कष्ट घेतले. आणि एकदाची वाचवली बारामती. दादांचा हिशेब चुकला शिवसेनेच्या वाघानं/(ठाकरेंसह) पार्थची धोबीपछाड केली. सध्या ठाकरेंकडे मशाल आहे. त्यांची धून आहे, पेटवा मशाली।
दादांना लोकसभा नाही जमली. 2019 मध्ये मावळात पार्थ हरले. 2024 मध्ये बारामतीत नणंद भावजयात (सुप्रियाताई/सुनेत्राताई) आमने सामने झाली. तिथेही दादांना पराभवाचा झटका. कोणताही प्रयोग करा, दादांना अंगलटच. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा सुतोवाच मोदींनी केला. मग तर दादांची पळता भुई... सीएमचं (जनतेच्या मनातले) स्वप्न भंगलं. नागपुरी देवाकडे धाव घेतली. पदरात घ्या मला, मेरे लिए डिप्टी सीएम ही ठीक है। दिवारचा हा डायलॉग चपखल बसला
दोनएक वर्षानंतर देवाबरोबरच्या पक्षाशी (कमळाबाई म्हणून खिल्ली उडवायचे) युती करून दादा पुन्हा सत्तेत. आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेचा विक्रम कायमचाच प्रस्थापित केला.
एव्हाना वरीस उलटलं अन् पुन्हा पार्थ संकटी सापडला आणि श्रीकृष्ण धावून आला. "देव तारी त्याला कोण भारी," या म्हणीची अनुभूती सतत येत राहील. राजकारणात, अर्थकारणात भूखंडाचं श्रीखंड सुटत नाही. म्हणून पार्थला, देव तारी त्याला कोण भारी(मारी आणि भारी)चा सतत जप करावं लागेल की काय? कारण.. "पार्थ संकटात जड भारी। फडणवीस धाव घेती सत्वरी॥
What's Your Reaction?