भाजपा यांचेही लाड पुरवणार?
इनकमिंगना अच्छे दिन, निष्ठावंत भाजपाई पदवीधरसाठीही वंचित; पांडे, देशपांडे, परिचारक, शिंदे यांच्या उमेदवारीची अनिश्चितता वाढली
(विजयकुमार पिसे)
दर दोन टर्मनंतर विधान परिषद पदवीधर मतदारसंघात भाजपा पराभूत होतो. गत 24 वर्षांपासूनचा अनुभव. आता हा मतदारसंघ जिंकायचाच निर्धार भाजपाने केलाय. त्यामुळे पुणे विभागातील शहर आणि जिल्हा स्तराचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी निवडताना पुणेकर पांडेंनी खबरदारी घेतली, अशी चर्चा आहे. आता त्यात नव्याने भर पडली. अर्थात इनकमिंगना अच्छे दिन. बारामतीकरांच्या एका निष्ठावंताने त्यांची साथ सोडून कमळ हाती घेतले. त्यामुळे त्यांचेही "लाड" भाजपा पुरवणार अशी चर्चा आहे.
पुढील वर्षी पुणे आणि संभाजीनगर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. यासाठी प्रदेश भाजपाने दोन आठवड्यापूर्वी मतदार सहनोंदणी प्रमुख म्हणून सोलापूरचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, राहुल चिकोडे,अॅड.धर्मेंद्र खांडरे आणि संभाजीनगरसाठी राहुल लोणीकर, गुरूनाथ मगे या अनुभवी नेत्यांची नियुक्ती जाहीर केली. तर 7 ऑक्टोबरला पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रथमदर्शनी शरद लाड यांचा भाजपा प्रवेश म्हणजे आ.विश्वजीत कदम यांच्या अडचणीत वाढ. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती अग्रणी जी.डी.लाड यांचा वारसा आ.लाड होत. लाड "डाव्या" पुरोगामी विचारसरणीचे. त्यांनी राजकीय सोय म्हणून यू टर्न घेत थेट "उजवी" विचारसरणी स्वीकारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे साहजिकच पदवीधरसाठी सकृतदर्शनी लाड परिवाराचा दावा अग्रेसर ठरू शकतो.
5 वर्षापूर्वी भाजपाचे संग्राम देशमुख (सांगली) यांना पराभूत अरुण लाड आमदार म्हणून निवडून आले. वडिलांच्या विजयात शरद लाड निर्णायक ठरले. पदवीधर मतदार नोंदणी आणि निवडणूक व्यूहरचना यात त्यांचे कौशल्य दिसून आले. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला. तिथे लाड परिवाराने त्यांना टक्कर देत सहकारी तत्वावर पाणी पुरवठा आणि साखर कारखाना व्यावसायिक पध्दतीने यशस्वी करून दाखवला. त्यांची दूरदृष्टी जशी सहकारात, तशी राजकारणातही. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पदवीधर मतदारसंघात त्यांनी विजय मिळवून चंद्रकांतदादा पाटलांनाच एकप्रकारे आव्हान दिले. या मतदारसंघात चंद्रकांत दादांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. दादा तिसर्यांदा लढले असते तर? नक्कीच...
12 वर्षापूर्वी अरुण लाड यांनी अपक्ष म्हणून पदवीधरची निवडणूक लढवली. तेव्हा त्यांची बंडखोरी दादांच्या पथ्यावर पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील पराभूत झाले. या पराभवातून 6 वर्षापूर्वीच्या पदवीधर मतदारसंघात लाड यांनी साखर पेरणी केली. आणि भाजपाला अस्मान दाखवले. प्रारंभी वर नमूद केल्याप्रमाणे दर दोन टर्मनंतर भाजपा पराभूत होतो. मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रक़ाश जावडेकर दोन टर्म आमदार होते. चंद्रकांत दादा देखील दोन टर्म आमदार राहिले. जावडेकरांना मिरजेच्या प्रा.शरद पाटलांनी (ज.द.) पराभूत केले. तसेच दादांच्या दोन टर्मनंतर संग्राम देशमुखांची हार. यामागचे आणखी एक कारण म्हणजे भाजपाची मतदार नोंदणीत ढिलाई, गाफीलपणा आणि अतिआत्मविश्वास.
पुणे पदवीधरमध्ये पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे पुणे पदवीधरची जबाबदारी सोपविली आहे. ते स्वत: इच्छुकही आहेत. पक्ष पदाधिकारी निवडताना तशी त्यांची दृष्टीही. याशिवाय विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, माजी आ. प्रशांत परिचारक आणि दीपक शिंदे हे देखील इच्छुक आहेत. भाजपात सध्या इनकमिंगची "चलती" आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता "चलनी" नाणे नाही. त्यामुळे शरद लाड यांना भाजपात येउन या मतदारसंघात निवडणूक लढवायची असेल तर भाजपा त्यांचे लाड पुरवणार का?
पुढील लक्ष्यवेध : पदवीधरमध्ये नेहमीच वंचित ठेवला असा हा...
What's Your Reaction?