युवा नेते उदयशंकर पाटलांच्या मालमत्तेवर परळी वैजनाथच्या बॅकेचा ताबा
71 लाखांच्या थकबाकीमुळे सांकेतिक ताबा घेण्याची कारवाई
(विजयकुमार पिसे)
युवा नेते तथा उद्योजक उदयशंकर पाटील यांनी परळी येथील सहकारी बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेेण्याची कारवाई बँकेने 29 सप्टेंबर 2025 रोजी केली. 71 लाख 43 हजार 766 रुपयांचे कर्ज थकल्यामुळे ही कारवाई केल्याचे समजते.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात 2004 मध्ये उदयशंकर पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवल्यामुळे ते चर्चेत राहिले. परळी वैजनाथ येथील दि वैद्यनाथ अर्बन को.ऑप. बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे बँकेने उदयशंकर पाटील यांच्या नावावर सोलापुरातील प्रतिष्ठित अशा रेल्वे लाईन भागातील सिटी सर्व्हे नं.8316/3/1ए/3. म्यु.पल नं 57व 57 अ, क्षेत्र 570 चौ.मी. व त्यावरील बांधकाम या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतल्याचे जाहीर केले आहे.
उदयशंकरसह त्यांच्या पत्नी देखील कर्जदार आहेत तर कामती येथील काटकर आणि कुंभारीचे पाटील हे त्यांच्या कर्जास जामीनदार आहेत. ही मालमत्ता ताब्यात घेउन त्याबाबत कोणीही सौदा करू नये, तसेच कोणतेही सौदे अदायगीच्या दिनांकापर्यन्त कंत्राटभूत आणि झालेले अनुषंगिक खर्च किंमत अधिकार व त्यावरील व्याज अधिन असतील अशा प्रक़ारचे निवेदन बँकेने जारी केले आहे.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदयशंकर पाटील दोन वर्षापूर्वी काँग्रेसमधून भाजपात आले. पक्षाने त्यांना मोठी जबाबदारीही दिली. लोकसभा निवडणुकीत त्यांची सक्रियता भाजपाला उपयोगी पडली. गत विधानसभेसाठी दक्षिण सोलापूऱ आणि सोलापूर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती. मात्र भाजपाने देवेंद्र कोठे यांना संधी दिली. तेव्हापासून उदयशंकर पाटील पक्षात सक्रिय राहिले नाहीत.
राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघटन सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय यांचेशी त्यांची घनिष्ठता आहे. त्यांचे काका रविकांत पाटील इंडीचे (कर्नाटक) तीन वेळा तर रतिकांत पाटील दक्षिण सोलापूऱचे आमदार राहिले आहेत. तर चुलत बंधू अमर पाटील यांनी 2025 ची विधानसभा उबाठाकडून लढवली. आता ते शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. उदयशंकर पाटील पक्षात सक्रिय राहावे यासाठी भाजपाने नंतरच्या काळात खबरदारी घेतली नाही. त्यामुळे कोणत्याच कार्यक्रमात ते दिसत नाहीत.
What's Your Reaction?