६८ लिंग विकाससाठी २ कोटी मंजूर
देवाभाऊची देवेंद्रवर मर्जी खास,14 कोटींचा विशेष निधी पास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरच्या देवेंद्रनी विशेष मर्जी संपादन केली असून प्रथमच निवडून आलेल्या राज्यातील आमदारांसाठी विशेष निधीची तरतूद करून त्यांच्या मतदारसंघात विकासाची दिवाळी साजरी केली आहे. याअंतर्गत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्थापित ६८ लिंगांच्या विकासाकरिता आ. देवेंद्र कोठे यांना 2 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे. याशिवाय शहर मध्य मतदारसंघासाठी १२ कोटींचा विशेष निधी मंजूर केला असल्याचे आ.कोठे यांनी सांगितले.
2024-25 मध्ये 12 कोटींचा निधी यापूर्वीच दिला. आता 2025-26 च्या अर्थसंकल्पात 14 कोटींचा विशेष निधी आ.कोठे यांना दिला आहे. आ.कोठेंचे पालकत्व घेतलेले फडणवीस या विषयी पुरेपूर काळजी घेत आहेत. गत पावसाळी अधिवेशनात मतदारसंघातील विकासकामांची यादी आ.कोठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केली होती. सिद्धरामेश्वरांनी स्थापित 68 लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा आ. कोठे यांनी मांडला. यासाठी 6.80 कोटींची मागणी केली होती. त्यास अनुसरून फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात त्यांना दोन कोटींचा निधीचा अध्यादेश जारी केला आहे.
याशिवाय शहर मध्य मतदारसंघातील विकास कामांसाठी 14 कोटी वितरणाचा अध्यादेश निघाला असून यामध्ये मतदारसंघातील 45 प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. फडणवीस यांनी माझे पालकत्व स्वीकारल्यामुळे सिध्दरामेश्वरांच्या कृपेने शहर विकासाचे आणखी इतरही अनेक मुद्दे मार्गी लावू शकेन, असा विश्वास आ. देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?