मदरशात टोपी घालण्यास नितीश कुमारांचा नकार, राहुलच्या "वोटचोर"वर नवा ट्विस्ट
नीतीशकुमारांचा नवा रंग, 12 वर्षापूर्वी मोदींच्या कृतीला आक्षेप आणि आज स्वत:च यू टर्न, बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिमांपासून अंतर, 18 टक्के मतपेढीवर पाणी सोडणार?

(विजयकुमार पिसे)
बिहारच्या प्रत्येक निवडणुकीत अनेकविध रंग येतात. या रंगावरून निवडणूकही रंगते. बिहार बिमारू राज्य. जंगल राज म्हणूनही ओळख. विकास,रोजगार,कायदा सुव्यवस्था अशा भोवतीचे वादविवाद मागे पडलेत की काय? काँग्रेस आणि राजद यांनी वोटचोरवर आपला मोर्चा वळवला. पण नीतीशकुमारांनी मदरशात चक्क मुस्लिम टोपी घालण्यास नकार देऊन त्यांच्या वोटचोरवर नवा ट्विस्ट केला आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत चोरावर मोर कोण होणार ही उत्सुकता आहे खरी. पण तूर्तास याबाबत माध्यमंही संभ्रमात पडलीत.
12 वर्षापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाकडून आलेली टोपी नाकारली, तेव्हा नीतीशकुमार यांनी त्यांना सेक्युलरचे डोस पाजले होते. आज त्यांनीच ही कृती करून आपला नवा ट्रेंड अधोरेखित केला. नितीश कुमार यांनी स्वत:च टोपी घालण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बिहारच्या मदरसा शिक्षण मंडळ कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार,अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद खानसह उपस्थित होते. यावेळी आयोजक स्कल टोपी घालून स्वागत करत होते, तेव्हा नीतीशकुमारांचा "यू टर्न" दिसला. त्यांनी ही टोपी सहकारी मंत्री मोहम्मद खान यांना घातली. बिहारमध्ये मुस्लिम मतपेढी निर्णायक आहे. 18 टक्के मतांवरच गतवेळी नीतीशकुमार कसेबसे तरले होते. आता त्यांनी जुगार खेळण्याचे ठरवलेले दिसते.
कधी भाजपाच्या एनडीए सोबत, तर कधी काँग्रेसप्रणित यूपीएशी घरोबा करणारे नीतीशकुमार राजकारणातील (भजनलाल) आयाराम गयारामचे शिरोमणी असावेत, अशी त्यांची प्रतिमा आहे. 12 वर्षापूर्वी नितीश कुमार यूपीएचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते. नेमका हाच धागा धरून मोदी यांना उद्देशून म्हणाले, ज्यांना देश चालवायचा आहे, त्यांनी टोपीही घातली पाहिजे आणि टिळाही लावला पाहिजे, असे विधान केले होते. आज बारा वर्षांनी नीतीशकुमारांनीच उलटफेर घेतला आहे.
दहा वर्षापूर्वीच्या निवडणुकीत सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या एका विधानाचा आधार घेत नीतीशकुमारांनी डाव टाकला, आणि निवडणूक़ जिंकली. तेव्हा भाजपाची पिछेहाट झाली होती. हा देखील बिहारचा एक रंग आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणता रंग भरणार, या वर्षाअखेरीस कळणार हे स्पष्ट असले तरी नितीशकुमार याबाबतीत रंगरंगीले आहेत, हा रंगदेखील अधिकच गडद होत आहे.
What's Your Reaction?






