जरांगे आंदोलनात कोर्टाचा आदेश, 24 तासांचा अल्टीमेटम, उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईचे रस्ते खाली करा, आता जबाबदारी सरकार आणि आंदोलकांची

हायकोर्ट काय म्हणाले, आंदोलनाच्या अटींचे उल्लंघन, ते शांततेत नाही, आझाद मैदानात फक्त एक दिवस परवानगी, आंदोलकांना रोखा, जरान्गेना वैद्यकीय उपचार द्या

Sep 1, 2025 - 18:01
 0  379
जरांगे आंदोलनात कोर्टाचा आदेश, 24 तासांचा अल्टीमेटम, उद्या दुपारी 4 पर्यंत मुंबईचे रस्ते खाली करा, आता जबाबदारी सरकार आणि आंदोलकांची

(विजयकुमार पिसे)

 मुंबईत गेले चार दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे यांचे आंदोलन हाताबाहेर गेले आहे. अटींचे उल्लंघन झाले आहे, ते शांततेत होत नाही, आझाद मैदानात फक्त एक दिवसाची परवानगी होती, याकडे लक्ष वेधून घेत मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी आंदोलकांना उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते खाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच जरांगे यांची प्रकृती बिघडली तर तात्काळ वैद्यकीय उपचार द्या, असेही आदेशात नमूद केले आहे. 

   मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु असून 

सीएसएमटी, बीएमसी, चर्चगेट, हुत्मात्मा चौक या परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी झाली असून दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी आंदोलकांनी तळ ठोकला आहे. गर्दीमुळे रस्ते जाम झाले आहेत. वाहतुकीची कोंडी झाली आहे. यासंदर्भात सोमवारी मुंबई हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर तातडीची सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने, आंदोलकांनी सर्व रस्ते मोकळे करावेत, असे निर्देश दिले आहेत.

   प्रथमदर्शनी अंतरिम आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि अन्य प्रतिवादींनी प्रथमदर्शनी आंदोलनासाठी मिळालेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. तसेच त्यांना आझाद मैदानातील आंदोलनासाठी सध्या कोणतीही परवानगी नाही. मुंबईतील जनजीवन ठप्प होऊ नये, विशेषत: गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे. आंदोलकांनी रस्ते आणि सर्व संबंधित जागा आझाद मैदानातील विशिष्ट जागा वगळता उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करावेत. शिवाय राज्य सरकार आणि पोलिसांनी खबरदारी घेत आंदोलक मुंबईत येणार नाहीत, त्यांना रोखा, असा आदेशही हायकोर्टाने दिला आहे.

    याशिवाय, जर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली तर त्यांना तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करा, तसेच आता या याचिका नियमित खंडपीठासमोर उद्या दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यावेळच्या सुनावणीपर्यंत काय मार्ग निघेल, याकडे लक्ष राहणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow