सोलापूर जनता बँकेत नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची लवकरच सुविधा
अध्यक्ष सुनील पेंडसे यांची माहिती: यंदा बँकेला 32.17 कोटींचा निव्वळ नफा, आरबीआयचे निकष पूर्ण, एसजेएसबीचा नेट एनपीए 0.83 टक्के, धडाकेबाज वसुली

(विजयकुमार पिसे)
सोलापूर जनता सहकारी बँकेला (SJSB) आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये झालेली वसुली, कर्ज वाढ, एकूण व्यवसाय वाढ, गुंतवणुकीमुळे वाढीव व्याज यांचा एकत्रित परिणाम म्हणून लेखापरिक्षणपूर्व (unaudited) 32 कोटी 17 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी पत्रपरिषदेत दिली. बँकेने केलेल्या धडाकेबाज वसुलीमुळे बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन ग्रॉस एनपीए 5.77 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, तसेच नेट बँकिंग व मोबाईल बँकिंगची सुविधा लवकरच सुरू करणार आहोत, यासाठी आरबीआयचे निकष बँकेने पूर्ण केले आहेत, असेही पेंंडसे म्हणाले.
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण 41 शाखा असून 1904 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने 1074.16 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय 2978 कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल 72.12 कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) 12 टक्के असणे अपेक्षित आहे. यामध्येही आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता 18.80 टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले. बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए 0.83 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 901.22 कोटी रुपयांची गुंतवणूक सोलापूर जनता सहकारी बँकेने केलेली आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशोही मागील वर्षाच्या तुलनेत वाढून तो 86.31 टक्के झाला आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. गृह कर्ज देखील 8.50 टक्क्यांपासून देण्यात आल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून अनोखी भेट मिळाली आहे, असे अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले.या पत्रकार परिषदेस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, संचालक वरदराज बंग, प्राचार्य गजानन धरणे, तज्ञ संचालक सी. ए. गिरीष ka बोरगावकर, पुरूषोत्तम उडता, संचालिका चंद्रिका चौहान, विनोद कुचेरिया, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गज्जम, रामदास सिद्दुल, रमेश मामड्याल, मदन (मधुकर) मोरे उपस्थित होते.
*SJSB ची कामगिरी दमदार*
सोलापूर जनता सहकारी बँकेचे 70 हजार सभासद असून भाग भांडवल 72.12 कोटी रुपये आहे. एकूण ठेवी 1904.14 रुपये आहे. बँकेने मागील आर्थिक वर्षात 1074.16 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली आहेत. बँकेने 901.22 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून बँकेचा नेट एनपीए 0.83 टक्के तर निव्वळ नफा 32.17 कोटी रुपये झाला आहे. आरबीआयचे कोणतेही निर्बंध सोलापूर जनता सहकारी बँकेवर नाहीत.
ग्राहक, सभासदांसाठी नेट, मोबाईल बँकिंग
ग्राहक आणि सभासदांच्या हितासाठी बँकेची नेहमीच भूमिका राहिली आहे. त्यांच्या सुविधेसाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुरू करण्यासाठीचे आरबीआयचे निकष बँकेने पूर्ण केले आहेत. त्यामुळे बँकेला नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.
What's Your Reaction?






