मोबाईलशिवाय 15 दिवस! संघ शिक्षा वर्गातील अनुभव..
मोबाईल जगतात बिझी 43 व्यावसायिकही रमले, त्यांनी स्वत:ला ठेवले मोबाईलपासून अंतर

(विजयकुमार पिसे)
मोबाईल मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलशिवाय क्षणभरही न राहणारे अनेक जण आहेत. काहींना तर मोबाईल व्यसन. पण रा.स्व.संघाच्या संघ शिक्षा वर्गात मोबाईलशिवाय 15 दिवस असाही अनुभव विरळाच. आपल्या उद्योग व्यवसाय,नोकरीत बिझी शेड्युल असणारे 43 स्वयंसेवकांनी वर्गाच्या सुरवातीस मोबाईलचा वापर करून पाहिला. पण नंतर त्यांनी देखील स्वत:लाच मोबाईलपासून अंतर ठेवले आहे. संघ शिक्षा वर्ग म्हणजे साधना. वेळेचा सदुपयोग अशीच रचना असते. शिट्टी आणि शंख हे पुढील कार्यक्रमाचे संकेत. त्याबरहुकूम 15 दिवसांची दिनचर्या.
सोलापुरात ह.दे.प्रशालेत रा.स्व.संघाचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग 16 मे पासून सुरू झाला आहे. येत्या 1 जून रोजी या वर्गाचा समारोप होणार आहे. संघदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सात जिल्ह्यांमधील 83 गावांतून 293 शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक स्वयंसेवक शिक्षार्थी म्हणून सहभागी आहेत. यामध्ये 43 व्यावसायिक असून डॉक्टर, वकील, अभियंते, शेतकरी, सराफी तसेच शेअर मार्केटिंग व्यवसायातील आहेत. यापैक़ी अनेक जणांना आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी मोबाईल अनिवार्य आहे. तरी देखील त्यांनी मोबाईलचा वापर टाळला आहे. संघ शिक्षा वर्गात ज्या दिवशी प्रवेश केला, तेव्हापासून रोकड, मोबाईल, घड्याळ आणि किंमती वस्तू संघ शिक्षा वर्गाच्या लॉकरमध्ये जमा होतात. वर्ग संपल्यानंतरच त्या ताब्यात मिळतात. वर्ग सुरू झाल्यानंतर प्रारंभी व्यावसायिकांची आवश्यकता लक्षात घेऊन अपवादस्थितीत काही व्यावसायिकांना मोबाईल वापरास मुभा दिली होती. पण मोबाईलशिवाय दिनचर्या पार पाडण्याचा प्रयत्न नंतर करून पाहिला. त्यावेळी आपला व्यवसाय, सराफी आणि शेअर बाजारातील नित्य उलाढाली, चढउतार, वकीलांचे क्लाईंट यांच्याशी सल्लामसलत या अत्यावश्यक बाबी नकोच नको, संघ शिक्षा वर्ग पार पडल्यानंतर पाहू, म्हणून या व्यावसायिकांनी मोबाईल लॉक करून टाकले.
संघ म्हणजे शिस्त आणि माणूस घडविण्याचे ठिकाण म्हणजे संघाची शाखा. संघ शिक्षा वर्गात शिस्त आणि स्वावलंबनाचे धडे अधिक़ कठोरपणे आचरणात आणणारे दैनंदिन वेळापत्रक असते. पहाटे साडेचार वाजता जागरण, प्रात:स्मरण, योग, शारीरिक व्यायाम, नियुध्द, दंड प्रहार, गटश: चर्चा, पाठांतर, टिपण, चिंतन, बौध्दिक, समता, संचलन, सेवाकार्य असे रात्री साडेदहा पर्यन्त व्यस्त वेळापत्रक. सर्वांचा निवास अन्य गावांतून आलेल्या स्वयंसेवकांसमवेत असतो. यामुळे 15 दिवसांत त्यांचा निकटचा परिचय होतो. स्वत:चे ताट, वाटी, तांब्या, स्वत:चे कपडे धुणे, एकत्रित सहभोजन, वाढप यामधूनही शिस्त आणि स्वावलंबनाचे धडे मिळतात. संघ शिक्षा वर्गात तरुणांचा वाढता कल देखील लक्षात येतो. 293 शिक्षार्थ्यांमध्ये 80 तरुण, 115 महाविद्यालयीन विद्यार्थी, 55 शालेय विद्यार्थी, आणि 43 व्यावसायिक आहेत. तरुणांची वाढती संख्या देशभरात अन्यत्र सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गात देखील आहेेे.
*व्यवस्थात्मक रचना...
15 दिवसांच्या संघ शिक्षा वर्गात व्यवस्थात्मक रचना असून वर्ग सर्वाधिकारी अॅड.प्रशांत यादव, कार्यवाह अॅड.आनंद कुलकर्णी, श्रीनिवास पुलय्या वर्ग पालक आणि मुख्य शिक्षक अक्षय खांडेकर आहेत. त्यांच्या देखरेखीखाली संघ शिक्षा वर्ग पार पडत आहे. येत्या 31 मे रोजी सायंकाळी 6 वा.प्रक़ट समारोप असून ए.जी.पाटील कॉलेजचे सिध्देश्वर पाटील प्रमुख अतिथी आणि पश्चिम क्षेत्र सहकार्यवाह यशवंतभाई चौधरी हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
What's Your Reaction?






