रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे सघोष पथसंचलन, रिमझिम पावसाचीही हजेरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणार्थींचे अतिशय शिस्तबद्ध संचलन शहरात पार पडले. संघाच्या संपूर्ण गणवेशात पारंपारिक वाद्यांच्या तालावर शिस्तबद्ध निघालेल्या संचलनाचे शहरवासीयांनी स्वागत केले. घोष पथकाच्या विविध रचनांवर संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे देशभक्तीची प्रचिती सोलापूरकरांनी सोमवारी अनुभवली. रिमझिम पडणाऱ्या पावसात देखील रा.स्व. संघाच्या प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचा देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
या संचलनामध्ये हरीभाई देवकरण येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी ॲड. प्रशांत यादव, वर्ग कार्यवाह ॲड. आनंदराव कुलकर्णी, सोलापूर शहराचे संघचालक राजेंद्र काटवे आदि उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व देशभक्तीमय वातावरणात निघालेल्या या संचलनाच्या सुरुवातीला स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या त्यानंतर स्वयंसेवकांचे पहिले घोषपथक त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरु असलेला परमपवित्र भगवा ध्वज हाती घेऊन निघालेल्या स्वयंसेवकास चार ध्वज संरक्षकांचे सुरक्षाकडे, त्यानंतर पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या त्यानंतर पुन्हा दुसरे घोषपथक आणि त्यामागे पुन्हा स्वयंसेवकांच्या दोन वाहिन्या अशा पद्धतीने या वर्गाच्या शिस्तबद्ध संचलनाची रचना करण्यात आली होती.
सायंकाळी सात वाजता हरिभाई देवकरण प्रशाला येथून या संचलनास सुरुवात झाली. परमपवित्र भगव्या ध्वजास प्रणाम करून संचलनास सुरुवात झाली. पारंपारिक वाद्यांच्या सुरेख, लयबद्ध तालात हे संचलन हरिभाई देवकरण प्रशाला ते रंगभवन - सातरस्ता - मसिहा चौक - मोदी पोलीस चौकी - पटवर्धन चौक मार्गे डफरीन चौक, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट मार्गे येऊन हरीभाई देवकरण प्रशालेत या संचलनाची सांगता झाली.
गणवेशातील प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध निघालेल्या या संचलनामुळे शहरातून देशाच्या संरक्षण दलाचेच संचलन होत असल्याचा अनुभव सोलापूरकरांना आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभक्तीमय संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
सात रस्ता येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांतर्फे संचलनावर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.
What's Your Reaction?






