गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नाचल्यास पोलिसांवर थेट कारवाई

पोलिस आयुक्त एम.राज कुमार यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांना इशारा

Sep 11, 2024 - 07:08
 0  46
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नाचल्यास पोलिसांवर थेट कारवाई
एम राज कुमार सोलापूर पोलीस आयुक्त

सोलापूर: शहरात सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. १७ सप्टेंबर रोजी गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे, यामध्ये पोलिस खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना नृत्य करता येणार नाही. असा प्रकार आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिला. मिरवणुकीच्या उद्घाटनानिमित्त पोलिस अधिकाऱ्यांना बोलावले जाते. त्यानंतर मिरवणुकीत त्यांना संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून नृत्य करण्यास सांगितले जाते. शिवाय काही ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मिरवणुकीतील वाद्यांवर नृत्य करण्यास भाग पाडले जाते. काही ठिकाणी कर्मचारी स्वतःहून नृत्य करतात. असे प्रकार यापूर्वी घडले असून, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. गणेशोत्सवात भक्तांच्या आनंदाला पारावार उरत नाही. असे..

असले तरी पोलिसांना यामध्ये सहभागी होऊन नृत्य वगैरे करता येत नाही. पोलिस दल हे शिस्तीचे दल असून, काही नियमावली आखून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना, गणवेशात अथवा साध्या कपड्यांवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाचणे अयोग्य आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडावे. असेही राज कुमार यांनी सांगितले.

मिरवणुकीदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त

१७ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांतून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक आयुक्त, २१ पोलिस निरीक्षक, ५६ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. एसआरपीएफच्या दोन तुकड्याही येणार आहेत. शिवाय गृहरक्षक दल (होमगार्ड) चे जवान मोठ्या संख्येने तैनात असणार आहेत,

मुंबईतील कारवाईनंतर राज्यभर काढले आदेश

मुंबईत एका मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिस नाचले होते. त्यानंतर या प्रकाराच्या अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. यानंतर पोलिसांना मिरवणुकीत न नाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी खाकी वर्दी अंगावर असताना मिरवणुकीत नाचता कामा नये, तशी त्यांना परवानगी नाही. हे कृत्य अवमानकारक आणि अक्षम्य आहे, असे तत्कालीन अधिकायांनी म्हटले होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow