दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरे सेनेचा सांगली पॅटर्न
काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न; खा. राऊत यांची अमर पाटील यांना साथ
राज्यात महायुती सरकार उलथवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली. परंतु ठाकरे यांना सीएमचा चेहरा करण्यास पवार आणि काँग्रेसने खोडा घातला. त्यामुळे खा.संजय राऊत लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील 'सांगली पॅटर्न' अवलंबण्याचा इरादा केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी गुरुवारी घेतलेला मेळावा हे स्पष्ट करतो. सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत ती जागा काँग्रेसची असताना शिवसेनेने घाईघाईत सर्वप्रथम आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसने उमेदवार दिला नाही. मात्र स्थानिक काँग्रेसजणांनी आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी दिली. आणि त्यांना निवडूनही आणले. शिवसेनेचे पहिलवान चंद्रहार पाटील पराभूत झाले. त्यामुळे शिवसेनेचे नाक कापले गेले, तसेच खा. संजय राऊत हे दुखावले गेले आहेत. त्यात भर म्हणजे ठाकरे सीएम पदाचे चेहरा असणार नाहीत. म्हणून याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी दक्षिण सोलापुरात काँग्रेस विरोधात शिवसेनेची उमेदवारी देण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी खा. राऊत गुरुवारी सोलापुरात येऊन शिवसेनेचा जंगी मेळावा घेतला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर रतिकांत पाटील यांना विधानसभेची उमेदवारी देण्याविषयी घाटत आहे. अमर पाटील यांचे पिताश्री रतिकांत पाटील शिवसेनेचे २०००९ पूर्वी आमदार होते. २००९ मध्ये काँग्रेसचे दिलीप माने यांनी त्यांचा पराभव केला. त्याचे उट्टे काढण्यासाठी पाटील परिवाराने कंबर कसली असून खा. राऊतांमार्फत ही जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्यासाठीच शिवसेनेच्या मेळाव्यास राऊत यांनी आवर्जून हजेरी लावली, असे, सांगितले जाते. काही महिन्यापूर्वी खा. राऊत सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी पाटील यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच पाटील परिवार तयारीस लागला आहे. सांगलीत शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना, काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांनी आसमान दाखवले. त्यामुळे महाराट्र केसरी चित झाला. हे शल्य शिवसेना विशेषत: खा. राऊत यांना बोचत आहे, म्हणून त्यानी दक्षिण सोलापुरात पाटील यांची विधानसभेसाठी उमेदवारी देऊन काँग्रेसची कोंडी करण्याचा इरादा दिसतो आहे. या मतदार संघात काँग्रेसचा दावा नैसर्गिक आहे, दिलीप माने हे संभाव्य उमेदवार आहेत. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने भाजपाकडून पराभूत झाले. यावेळी भाजप - शिवसेना युती नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे गणेश वानकर उमेदवार होते. वानकर यांच्यामुळे मतविभागणी झाली. त्याचा फटका मराठा समाजाचे उमेदवार मानेंनाही बसला. आता देखील वानकर इच्छुक आहेत. परंतु खा. राऊत यांचे अमर पाटील यांना आशीर्वाद आहेत. या निवडणुकीत अमर पाटील यांनी लढत दिली तर काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दक्षिण सोलापुरात शिवसेनेचा 'सांगली पॅटर्न' होईल का याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?