करमाळा, सांगोलेत काँग्रेसची पाटी कोरी!
आणखी काही मतदार संघ 'स्वाहा

सोलापूर : जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात 61 इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ज्या करमाळा मतदार संघातून झाली, तिथे आज काँग्रेसची पाटी कोरी आहे. तसेच सांगोला येथे काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकून आता विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदावर दावा ठोकलेल्या काँग्रेसची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात स्थिती फार चांगली आहे असे नाही. काँग्रेस पक्षाने इछुकांना पक्ष कार्यालयाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात 61 उमेदवारी मागितली आहे. यामध्ये करमाळा आणि सांगोला या दोन मतदारसंघातून एकही अर्ज आलेला नाही. याचा अर्थ इथे कॉंग्रेसचे अस्तित्व आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात करमाळा आणि सांगोला यांचे महत्व दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय कारकीर्द करमाळा येथून झालेली आहे. येथील जेष्ठ नेते स्वर्गीय नामदेवराव आणि त्यांचे पुत्र जयवंतराव हे काँग्रेस विचारांचे पाईक होते. आज त्या करमाळ्यात काँग्रेस अस्तित्वहीन झाला आहे. तसेच ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख नऊ वेळा सांगोला विधानसभा जिंकली. राज्यात शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कच्छपी गेल्यामुळे तिचे अस्तित्व संपल्यात जमा आहे. या दरम्यान काँग्रेसचे युवक आघाडीचे अध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी कांगेर्सचे तिकिटावर निवडणूक जिंकली, हा इतिहास विसरून चालणार नाही. १९९५ मध्ये शहाजी बापू यांनी भाई गणपतराव देशमुख यांचा १९२ मतांनी अनपेक्षित पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. अशा स्थितीत काँग्रेस लढविण्याचे धाडस दाखवत नाही.
जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात शहर मध्य हा एकमेव मतदार संघ काँग्रेसच्या खात्यात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत 11 पैकी किती मतदारसंघात काँग्रेसला किती जागा लढवता येतील, याची उत्सुकता आहे. शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तसेच शहर उत्तर या जागा देखील काँग्रेसच्या खात्यातील आहेत. परंतु आघाडीत तूर्तास शहर उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार अशी चिन्हे आहेत. तसेच दक्षिण सोलापूरवर उबाठाने दावा केला आहे. शहर मध्य वर माकपाचे आडम मास्तर हेही दावेदार आहेत. अशा स्थितीत अक्कलकोट एकमेव मतदार संघ कांग्रेसच्या हक्काचा आहे. त्यामुळे करमाळा, सांगोला शिवाय आता कोणत्या मतदारसंघात काँग्रेसला 'स्वाहा:' करावा लागेल, हे निवडणुकीच्या आखाड्यात कळून येईल.
What's Your Reaction?






