एकशे नऊ तलाठी अन् एकशे पंधरा महसूल सहायक पदे रिक्त

कामाचा ताण : महसूलमध्ये एकूण ३०२ पदे रिक्त

Sep 11, 2024 - 07:00
 0  27
एकशे नऊ तलाठी अन् एकशे पंधरा महसूल सहायक पदे रिक्त

सोलापूर : महसूल विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सध्या कामाचा ताण असून, वर्कलोड होत असल्याने कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालयात थांबताहेत. महसूल विभागातील विविध कार्यालयांमध्ये सध्या ३०२ पदे रिक्त असून, यात १०९ तलाठी पदे, तसेच ११५ महसूल सहायक पदे रिक्त आहेत. नायब तहसीलदाराची ५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे तत्काळ भरल्यास महसूलच्या कामाची गती वाढणार आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एकूण १५ उपजिल्हाधिकारी पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ एक पद रिक्त आहेत. लेखाधिकारीची २ पदे मंजूर असून दोन्ही पदे रिक्त आहेत. सहायक लेखाधिकारीची २ पदे मंजूर असून, यापैकी एक पद रिक्त आहे. निम्नश्रेणी लघुलेखची ८ पदे मंजूर असून, यातील ३ पदे रिक्त आहेत. १७७ मंडल अधिकारी पदे मंजूर असून, यापैकी ५ पदे रिक्त आहेत. अव्वल कारकून १९९ पैकी १३ पदे, शिपाई १५५ पैकी ४२ पदे रिक्त आहेत. अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, तलाठी भरतीसंदर्भात २०२३ मधील उर्वरित एकूण ३६ उमेदवारांस नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. शिपाईसंदर्भात १५५ पैकी ३९ पदे निरसित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

आकृतीबंध प्रस्ताव शासनाकडे

शिपाई तसेच वाहन चालकांना पदोन्नती द्यावयाचे आहे. परंतु, बहुतांश शिपाई अन् वाहनचालक यासाठी पात्र ठरेनात. यासंबंधीचा आकृतीबंध प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. शासनाने अद्याप यास मंजुरी दिली नाही. पुरवठा विभाग स्वतंत्र झाल्याने मनुष्यबळाचा तुटवडा आणखीन जाणवत आहे. वरिष्ठ अधिकारी पातळीवर रिक्त पदांची संख्या अत्यल्प आहे. सर्वाधिक महसूल सहायक, तसेच तलाठी पदे रिक्त आहेत. यासंदर्भात लवकर कार्यवाही करू, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow