शिंदे सेना भाजपातच विलीन केली तर? महायुतीत काटाकाटी

पक्ष सोडणार्‍यांचे शिवसैनिकांकडून स्वागत आणि शुभेच्छा, भाजपात जाताय तर आमच्याही शुभेच्छा, पण तो शिस्तीचा पक्ष आहे म्हणून कानही टोचले, केवळ तिकीटासाठी भाजपा प्रवेश असेल तर भाजपाई...

Aug 19, 2025 - 10:46
 0  318
शिंदे सेना भाजपातच विलीन केली तर? महायुतीत काटाकाटी

(विजयकुमार पिसे)

2021 मध्ये शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादीचीही दोन शकले झाली. या पक्षांवर हक्क कुणाचा, हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. पण या दरम्यान अंतर्गत कलहामुळे हे पक्ष पुन्हा फुटले तर. न पेक्षा शिंदे सेना भाजपातच विलीन केली तर? कारण महायुतीतच काटाकाटी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांनी भाजपाची वाट धरली. त्यांच्या या निर्णयाचे शिवसैनिकांनी चिमटे काढत स्वागत केले. सावंत समर्थक माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, हरिकांत चौगुले, मोटे यांनी भाजपा प्रवेशाची घोषणा करताक्षणी शिवसैनिकांनी या फुटीरांना पुष्पगुच्छ देउन शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपात जाताय तर निश्‍चित जा,पण तो शिस्तीचा पक्ष आहे, या शब्दात कानही टोचले. महायुतीमधीलच ही काटाकाटी सोमवारी सोलापुरातच झाली. तेव्हा शिंदेसेना सोडणार्‍यांचे चेहरे पाहण्यासारखे होते.

 महायुतीमधीलच पक्षात फोडाफोडी सुरू झाली म्हणजे याचा शेवट कसा? हे आज तरी अनुत्तरीत आहे. मात्र भविष्यात हे ओझे पेलवणे भाजपाला महागात पडण्याची भीती पक्षात व्यक्त होत असतानाचा भाजपा म्हणजे सर्वांसाठी मुक्तद्वार आहे. त्यामुळे भविष्यात शिंदे सेना असो वा अजीतदादा गट भाजपात विलीन झाला तर आश्‍चर्य वाटू नये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर दौर्‍यानंतर भाजपा प्रवेशुच्छुकांना उधाणच आले. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मूळचे काँग्रेसी. (सुशीलकुमार शिंदे समर्थक, नंतर शरद पवार समर्थक) अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि शिंदेसेनेशी घरोबा केला. तिथेही मन रमेना म्हणून दिलीप कोल्हे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेउन भाजपा प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. महायुतीतच काटाकाटीचा हा प्रक़ार म्हटला तर अनपेक्षितच. शिंदे सेनेत काहीच कल्याण होत नाही, होणार नाही. शिवाय आगामी महापालिका निवडणुकीतही भवितव्य दिसत नाही. हे लक्षात येताच त्यांनी शिंदे सेनेला जय महाराष्ट्र केले. इकडे पत्रकार परिषद सुरू असतानाच सभागृहाबाहेर शिवसैनिक आणि शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे पुष्पगुच्छ घेउन त्यांच्या स्वागताला उभे होते. कोल्हे आणि सावंत समर्थक़ बाहेर येताच,त्यांना पुष्पगुच्छ देउन शुभेच्छा दिल्या. भाजपात जाताय तर आमच्या शुभेच्छा आहेतच. पण हा पक्ष शिस्तीचा आहे, त्या शिस्तीत तुम्हालाही राहावे लागेल, असेही सुनावले.

**शिंदेसेना सोडण्याचे कारण* 

तानाजी सावंतांच्या घरात कुटुंब कलह शिरला आहे. स्वत: सावंत शिंदेसेनेत नाराज आहेतच. त्यांचे बंधू शिवाजी सावंत जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. पण त्यांच्या परस्पर शिंदेसेनेत भरती सुरू आहे. यापूर्वी दोन वेळा एकनाथ शिंदे यांचा दौरा नक्की होता, पण दोन्हीवेळेस शिंदेंनी ठरवून दांडी मारली. त्यामुळे शिंदेसेनेत आपले अस्तित्व शून्य आहे, ही मुख्य बाब. सावंतांचे पुतणे अनिल सावंत शरद पवार गटात आहेत, त्यांनी पंढरपूर विधानसभेची निवडणूकही लढवली. यात प्रा. शिवाजी सावंत कणाहीन ठरले आहेत. त्यांनी शहर मध्य विधानसभा लढण्याची जोरदार तयारी करून अर्थपेरणीही केली. पण भाजपाने काटशह देत ही जागाच शिवसेनेकडून काढून घेतली. आता त्याच भाजपाच्या पदराखाली शिवाजी सावंत आसरा घेणार आहेत. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत भाजपा कुणालाही गृहित धरणार नाही. भाजपाशिवाय निवडून येण्याची गॅरंटी देखील नाही. त्यामुळे शिवसेना आताच सोडलेली बरी म्हणून सावंत गटाने जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे.   

माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे मूळचे काँग्रेसी. गत (2017) मनपा निवडणुकीत शिवसेनेचे वानकर यांनी त्यांना पराभूत केले होते. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे तिकीट मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही. शिवाय युती होण्याविषयी साशंकता आहे. न पेक्षा आताच भाजपात गेलो, आताच तिकीट बुकींगही झाले तर निवडून येण्याची हमखास गॅरंटी. तीच भूमिका हरिभाऊ चौगुले यांचीही. आगामी राजकीय गणिते हेरून शिंदेसेनेतील काहीजणांनी धूर्तपणे हा डाव टाकला आहे. पालकमंत्री गोरे, आ. कल्याणशेट्टी आणि आ. कोठे यांच्या माध्यमातून त्यांचा भाजपा प्रवेश नक्की मानला जातो आहे. पण केवळ तिकीटासाठी भाजपा प्रवेश असेल तर भाजपाई कितपत हा डाव यशस्वी करू देतील हे वेगळे सांगणे नकोय.    

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow