निवडणूक झाली.. तरीही राधाकृष्णनच होणार उपराष्ट्रपती

महाराष्ट्रातील दोन राज्यपालांना उच्चपदस्थानी संधी, शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती, आता राधाकृष्णन उपराष्ट्रपती, भाजपाचा दक्षिण दिग्विजय

Aug 18, 2025 - 10:08
 0  214
निवडणूक झाली.. तरीही राधाकृष्णनच होणार उपराष्ट्रपती

(विजयकुमार पिसे)

 उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा रविवारी रात्री भाजपाने केली. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करून भाजपाचेे धक्कातंत्र पुन्हा अधोरेखित केली. महाराष्ट्रातील दोन राज्यपालांना उच्चपदस्थानी संधी मिळाली, शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती झाले, आता राधाकृष्णन उपराष्ट्रपती होतील. तसेच भाजपाचा दक्षिण दिग्विजय हेतूही स्पष्ट आहे. 

कर्नाटकात भाजपा सत्तेत राहिला आहे. आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री चंद्राबाबूंसमवेत युती आहे. तेलंगाणात केसीआरची सत्ता उलथवली. काँग्रेसला मुकाबला देण्याइतपत भाजपाची ताकद वाढली आहे. केरळातही भाजपा आस्ते कदम आहे. राहिलेले राज्य तमीळनाडू. येथे अण्णा द्रमुक सोबत भाजपाची युती आहे. दोन वेळा भाजपाचे खासदार राहिलेले, आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष म्हणूनही राधाकृष्णन यांनी काम पाहिले आहे. दक्षिण दिग्विजयसाठी या जमेच्या बाजू म्हणता येईल. धनखड यांच्यापूर्वी व्यंकय्या नायडू हे (आंध्रप्रदेश) उपराष्ट्रपती म्हणून आपल्या कामाची छाप सोडली आहे.

     जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. माध्यमांमधून अनेक नावांची चर्चा सुरू होती, त्या सर्वांना धक्का देत भाजपाने अनपेक्षितपणे राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. कारण राज्यपाल राधाकृष्णन यांच्या नावाची चर्चा कुठेच नव्हती. दरम्यान, उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा करण्यात आली, त्यापाठोपाठ संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधला. एकमताने उपराष्ट्रपतीपदाची निवड व्हावी, अशी राजनाथसिंग यांची अपेक्षा आहे. दरम्यान इंडी आघाडीची सोमवारी सकाळी बैठक होत असून तेव्हा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत निर्णय होईल, असे अपेक्षित आहे.

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना एनडीएचा उमेदवार निवडण्याचा अधिकार दिला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक़ मतदान झाले तरी राधाकृष्णन जिंकणार हे अटळ आहे. जिंकण्यासाठी 392 मतदानाची आवश्यकता असून एनडीएकडे 422 संख्याबळ हे पुरेसे आहे. 

राधाकृष्णन यांचा प्रदीर्घ अनुभव

राधाकृष्णन हे गेल्या तीन दशकांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. भाजपाच्या तिकीटावर दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. 18 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow