नक्कीच सोलापूरमध्ये आयटी पार्क होणार!

आयटी पार्कसाठी कुंभारी हा चांगला पर्याय.. पुणे, बंगळुरू, हैदराबाद या तीन आयटी महानगरांसाठी आता ठरेल सोलापूर हे मध्यवर्ती शहर

Aug 18, 2025 - 09:52
 0  279
नक्कीच सोलापूरमध्ये आयटी पार्क होणार!

(विजयकुमार पिसे)

सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग आणण्यात येतील. शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योगिक विकासावर भर देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर उत्तर मतदारसंघातील पीएम योजनेअंतर्गत अटल गृहनिर्माण संस्थेच्या गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिले. त्यामुळे सोलापुरात आयटी पार्क नक्कीच होणार ही खात्री बाळगता येईल.

     काँग्रेस सरकारच्या काळात बंद पडलेली विमानसेवा तीन महिन्यापूर्वी सुरू केली. सोलापूर-गोवा विमानसेवा यशस्वी सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोलापूर येथून मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू करण्याविषयीच्या निर्णयावर फडणवीस यांनी मोहोर लावली. त्यामुळे येत्या काळात शहराचा औद्योगिक विकासही होईल, असा विश्‍वास व्यक्त करायला हरकत नाही. सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी तसेच येथील बेरोजगार तरुणांचे स्थलांतर थांबावे यासाठी मोठा उद्योग,आयटी पार्क देण्याची मागणी सोलापूर उत्तरचे आमदार तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांंनी केली होती. त्यास अनुसरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिक़ारी यांना सुचवले. आयटी पार्कसाठी उत्तम जागा शोधा, एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क तयार करून देतो. आयटी कंपन्यांना इथे घेऊन येऊ, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

     सोलापूरसाठी अनेक योजना मागितल्या, मुख्यमंत्रीपदाच्या काळात (2014 पासून) अनेक योजना पूर्ण केल्या. पुणे मुंबई विमानसेवा सुरू करणार आहोत. सोलापूर विमानतळासाठी अन्यही सुविधा निर्माण करण्याविषयी काम मार्गी लावले जाईल, असेही ते म्हणाले.

आ.देवेंद्र कोठे यांचे ते पत्र..

    सुसज्ज आयटी पार्क उभारा, सोलापूऱचा कायापालट होईल. 4000 ते 5000 आयटी पदवीधर युवक बौध्दिक कौशल्यासह बाहेर पडतात. सोलापुरात 50 ते 60 छोटे आयटी उद्योग आहेत. 50 एकराच्या परिसरात आयटी पार्क उभारता येईल. अशा आशयाचे पत्र वर्षा निवासस्थानी आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्याचेही स्मरण मुख्यमंत्र्यानी आज सोलापूर दौर्‍यात दिलेल्या आश्‍वासनातून होते आहे.

    सोलापूरपासून 11 कि.मी.अंतरावरील कुंभारी येथे एमआयडीसीची गत दहा वर्षांपासून चर्चा आहे. पण स्थानिकांच्या प्रतिसादाअभावी नियोजित एमआयडीसी आणि त्यासाठी भूसंपादन रखडले आहे. आता आयटी पार्क करण्याचे ठरल्यास कुंभारी येथे एमआयडीसीच्या माध्यमातून हे शक्य आहे. सोलापूर/अक्कलकोट सिमेंट रस्ता मोठा आणि द्रुतगती झाला आहे. शिवाय याच भागातून सुरत/चेन्नई महामार्ग गेला आहे. नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ शिवाय होटगी विमानतळ ही दोन्ही ठिकाणच्या मध्यवर्ती कुंभारी गाव आहे.

दक्षिण भारतात पुणे,बंगळुरू आणि हैदाराबाद हे आयटी चे मुख्य विकसित केंद्र आहेत. सोलापूर हे प्रवेश दक्षिणद्वार आहे. या तीनही महानगरात आता आयटीसाठी पुरेशा जमिनी उपलब्ध होत नाहीत. सोलापूर येथे मुबलक जमीन आहे. शिवाय पुरेशा पायाभूत सुविधा झाल्या आहेत. आणि इथे बौध्दिक संपदा अमाप आहे. सोलापुरातूनच या तीन महानगरात सोलापूरची बौध्दिक संपदा आयात झाली आहे. अशा सर्व पर्यायांचा विचार केल्यास सोलापूरचे स्थलांतर घटेल, घटत्या लोकसंख्येची चिंता कमी होईल. 

हे लक्षात असू द्या, फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितलंय, सोलापूर दक्षिणेकडील महत्वाची महापालिका आहे. त्यामुळे आयटी पार्क निश्चित होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow