देवेंद्रच का!

देवेंद्रच का!

Nov 30, 2024 - 11:27
 1  811
देवेंद्रच का!

(विजयकुमार पिसे)

विधानसभा निवडणुकीत भाजपाची शतप्रतिशत कामगिरी होऊन देखील सत्तास्थापनेस होणार्‍या विलंबाने राज्यात संशयाचे काहूर उठले आहे. आणि दरतासाला नवीन खूळ डोक्यात आणण्याचे सुनियोजित प्रयत्न माध्यमकर्मीत सुरू आहे. यामागे कदाचित 2019 चा प्रयोग करून राज्याचा विचका करण्याचे नियोजित असावे, असे चित्र तयार होत असून तेव्हा देखील देवेंद्रच का? आणि आता 2024 मध्ये देखील शतप्रतिशत यश मिळवून देखील यशाचे मानकरी देवेंद्रच का? असा चिखल सुरू आहे. देवेंद्रच का. याचे कोडे सोडवता आले नाही, तर महाराष्ट्र मागे का गेला हा प्रश्‍न उपस्थित करण्याचा आपला अधिकारही राहणार नाही. तेव्हाही 2019 आणि आता 2024 मध्येही उत्तर एक़च देवेंद्र! 

 लोकसभा निवडणुकीत आलेले अनपेक्षित अपयश आणि पुढे पाच महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश यामागे देवेंद्र-नीती कारणीभूत आहे. महायुतीत (शिंदे सेना) अस्वस्थता, युतीत अजीतदादा गट नको, हा आग्रह. हतबल झालेले भाजपा कार्यकर्ते. अशी मरगळ. बाका प्रसंग. आणि माध्यमांचा नॅरेटिव्ह. शरद पवार केंद्रित निवडणूक़ अर्थात माध्यमकमींचा फोकसच होता तो. त्या सर्वांवर मात करून मिळवलेले अभूतपूर्व यश. ज्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे. त्या भीतीपोटीच निवडणूक़ निकालानंतर देवेंद्रच का? असा प्रश्‍न जोरकसपणे मांडून 2019 चा प्रयोग घाटत आहे. त्यांचा हा नॅरेटिव्ह प्रयोग असून तसे झाले तर महाराष्ट्राची पिछेहाट का झाली, हे विचारायचा अधिक़ारही राहणार नाही.

देवेंद्रच महाराष्ट्राचे नाथ आहेत, यात शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली. त्यामुळे यशाचे मानकरी तेच असे चित्र रंगवले जात आहे. भाजपा/शिवसेना/राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय, विश्वास फडणवीस यांनीच ठेवला. अगदी नवाब मलिक असो वा सदा सरवणकर यासारख्या संवेदनशील उमेदवारांच्या बाबतीतही महायुतीची गाडी रूळावरून घसरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेणारा देवेंद्रच. काही जुने सहकारी (त्यांची समजूत काढली तरी) साथ सोडून तुतारीच्या नादाला गेले. त्यांची (हर्षवर्धन, समरजीत इ.)अवस्था काय झाली. हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. याशिवाय काही सहकार्‍यांना शिंदे सेना आणि अजीतदादा गटात पाठवून त्यांची सोय केली आणि यापैक़ी अनेकजण निवडूनही आले. भाजपाचे सर्वाधिक 132 आमदार विजयी झाले. याशिवाय जनसुराज्य 2, रासप 1 आणि सहा अपक्ष शिवाय अजीत दादा गटाचे 41 आमदारांचा पाठिंबा पाहता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी 182 आमदार आहेत. बहुमताच्या बेरजेपेक्षा 37 आमदार अधिकचे आहेत. त्यामुळे याचे उत्तर स्पष्ट आहे, राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्रच का? 

रा.स्व.संघाने अपार कष्ट घेतल्यामुळे भाजपाला लोकसभेनंतर अच्छे दिन आले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही) मोदी सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची विघातक वक्तव्ये नव्हे तर त्यांची तशी योजनाच होती. त्यामुळे विरोधकांसाठी अभी नही तो कभी नही, अशी आरपार लढाई होती. या जाणीवेनेच संघ परिवारातील हजारो स्वयंसेवक तितक्याच ताकदीने मैदानात उतरले. आणि नरेंद्र मोदींना घालवण्यास सज्ज असलेल्या नॅरेटिव्हचा जिहादी बुरखा फाटला गेला. हिंदू हित म्हणजे देशहित. म्हणजेच महा+राष्ट्र हित. देव, देश आणि धर्मासाठीची ही लढाई आपण जिंकलीच आहे. तेव्हा उशीर का? देवेंद्रसाठी!!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow