अण्णा, उठा; रौत आलेत!

अण्णा, उठा; रौत आलेत!

Dec 2, 2024 - 12:24
 0  523
अण्णा, उठा; रौत आलेत!

(विजयकुमार पिसे) 

निवडणूक़ आणि निवडून येण्यासाठीच्या खटपटी व लटपटी नवीन नाहीत. साम,दाम,दंड,भेद नीतीशिवाय निवडणूक होत नाही. अगदी आता म.गांधी निवडणुकीत उभे राहिले तरीही. संजय राऊतांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नाही, ते सुरक्षित मागच्या दारानेच पुन्हा पुन्हा खासदार होतात. त्यांनीही निवडणूक़ लढवली असती तर? लोकसभा निवडणुकीत यशाने हुरळून गेलेले राऊत यांची "मावा" आघाडी विधानसभेत सपशेल चित झाली. भाजपा वा महायुतीचे महायश त्यांना खुपतेय. प्रचंड मोठ्ठा भ्रष्टाचार, इव्हीएम घोटाळे करून महायुती जिंकलीय, म्हणून अण्णा हजारेंनी आवाज उठवावा, ही रौतांची माफक अपेक्षा. निवडणूक़ निकाल लागून आठवडा लोटला. अजून अण्णांचा आवाज येत नाही. कारण कुणीही धुतल्या तांदळाचे राहिलेले नाहीत. (त्यांचे शिष्योत्तम अरविंद केजरीवाल यांचा आरसा समोर आहेच.) त्यामुळे अण्णा बोलणार काय? संजय राऊत विश्‍वप्रवक्ते आहेत. त्यांचा मान राखलाच पाहिजे. म्हणून अण्णा उठा. रौत आलेत. तूर्तास इव्हीएम व निवडणूक़ घोटाळ्यावर मावाला समाजवादी *बाबां* च्या आत्मक्लेषचा उतारा.

कडवट समाजवाद्यासाठी मवाळ हिंदू

निवडणूक़ निकाल आणि इव्हीएमच्या कथित घोटाळ्यावर पुण्यात बाबा आढावांनी आत्मक्लेष करून सर्वपक्षीय आव्वाज उठवला. त्यांची दखल देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाही, याची माध्यमकर्मीना भलतीच चिंता. पुण्यात असूनही फडणवीस फिरकले नाहीत, म्हणून माध्यमांनी कुजबूजही केली. या दरम्यान दोन्ही पवार येवून गेले. आणि समारोपाला कडवट हिंदुत्ववादी उध्दव ठाकरे हजर. त्यांच्या हस्ते जलप्राशन करूनच बाबांनी उपोषण मागे घेतले. वास्तविक हा सोपस्कार फडणवीसांनी करावा ही अपेक्षा. फडणवीस पडले कडवे देशभक्त. आत्मक्लेष कशासाठी असा त्यांचा सवाल असावा. बाबा आढाव समाजवादी. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी कधीच थारा दिला नाही. गेले ते दिवस. कडवट समाजवाद्यासाठी मवाळ हिंदुत्व धावून आले. उध्दव ठाकरेंकडे आता राहिलंय काय?

गांधीबाबा त्यांचा आणि यांचाही....

नोट लो, वोट दो, हा नारा आता चांगलाच रूढ झालाय. पूर्वी नोट दो, वोट दो, हा नारा लोकप्रिय. त्याचे कौतुकही खूप. कामगार नेते मास्तर निवडूनही आले होते. आता चक्र उलटलंय. त्यामुळे यंदा मास्तरांनीही नोट लो, वोट केलंय असं ऐकिवात आहे. गांधी बाबा सगळ्यांनाच प्रिय, गांधी बाबा त्यांचाही (पराभूत) होता. यांचाही (जिंकलेले) होता. पण यांच्या गांधीबाबाला मतदार पावले. म्हणून जिंकले. पडले ते रडताहेत. बक्कळ पैसा त्यांनी वाटला म्हून. तुम्ही वाटलेल्या नोटा/गांधीबाबा कारणी लागला नाही. इतकंच काय तो फरक.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow