अभिवादन : नारायण विनायक जगताप अर्थात जयंत विष्णू नारळीकर

महाराष्ट्र भूषण खगोलशास्त्रज्ञ यांची अशीही आठवण! लाखाचा निधी केला परत

May 20, 2025 - 19:46
 0  111
अभिवादन : नारायण विनायक जगताप अर्थात जयंत विष्णू नारळीकर

(विजयकुमार पिसे)

'आकाशाशी जडले नाते' हे खगोल शास्त्रीय भावविश्‍व सोप्या भाषेत उलगडून सांगणारे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनीच सांगितलेली ही आठवण, ते म्हणजे नारायण विनायक जगताप. इथूनच त्यांचे मराठी विज्ञान साहित्य बहरले. 

जयंत नारळीकर एका परिसंवादासाठी अहमदाबादला गेले असता व्याख्यानादरम्यान नोटस् काढता काढता त्याना एकदम स्फूर्ती आली आणि मनात घोळत असलेली गोष्ट 'कृष्णविवर' लिहायला सुरवात केली. ही घटना 1974ची. 'कृष्णविवर' आसपासचे सर्व पदार्थ शोषून घेतो. त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे आसमंतातील घड्याळे हळू चालतात, या परिणामावर आधारित ही कथा होती. नंतर ही कथा विज्ञान परिषदेकडे पाठवायची कशी? जयंत नारळीकरांचे नाव परिषदेच्या पदाधिकार्‍यांना आणि परीक्षकांना माहीत होते. त्याचा उलगडा होऊ नये आणि आपल्याला फायदा होऊ नये म्हणून वेगळ्या नावाने पाठवायचे त्यांनी ठरवले. आणि नारायण विनायक जगताप या नावाने, तेही पत्नीच्या हस्ताक्षरात वेगळ्या पत्त्यावर कथा लिहून पाठवली. नारायण विनायक जगताप या नावाची अद्याक्षरे उलट्याक्रमाने पाहिली तर जयंत विष्णू नारळीकर हे नाव येते. दरम्यान विज्ञान परिषदेचे पोस्ट कार्ड आले, त्यामध्ये या कथेला पहिले क्रमांक जाहीर झाले होते. त्या वार्षिक अधिवेशनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते जेव्हा गेले तेव्हा नारायण विनायक जगताप या नावाचा उलगडा त्यांनी केला. 

   ....पुढे दुर्गाबाई भागवत यांनी मराठी साहित्य संमेलनात या कथेचे कौतुक केले. विज्ञान कथेच्या माध्यमातून मराठी साहित्यात एक नवे दालन उघडले, असे गौरवोद्गार दुर्गाबाई भागवत यांनी काढले. आणि त्यामुळे हुरूप वाढला. अर्थात त्यामुळे मराठी साहित्य विश्‍वाला एक विज्ञान मराठी लेखक मिळाला. आज 20 मे 2025 रोजी अनंताच्या प्रवासाला निघाले. महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन...

*डॉ. जयंत नारळीकर यांची ह्द्यस्पर्शी आठवण....*

*लाखाचा निधी केला परत...*

नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाला डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थामुळे उपस्थित नव्हते. संमेलनातील प्रथेप्रमाणे संमेलन अध्यक्षांना लाखाची रक्कम ग्रामीण आणि दुर्गम भागात मराठी साहित्याला बळ मिळावे, साहित्य चळवळ वाढीस लागावी, प्रवास यासाठी हा निधी दिला जातो. आणि ही रक्कम घेवून प्रा.मिलींद जोशी त्यांच्या घरी गेले. पण त्यांनी हा धनादेश तात्काळ नाकारला. आणि म्हणाले, कोरोनामुळे कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंधने आहेत. शिवाय प्रकृती स्वास्थ्यामुळे प्रवास करणे, तिथे हजर राहणे शक्य नाही. त्यामुळे हा निधी साहित्य परिषदेला परत करत आहे. तो निधी साहित्य परिषदेच्या अन्य उपक्रमांना वापरा, ग्रामीण भागातील संस्थांना ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करा, तिथे मी उपस्थित राहीन. इतकेच नव्हे तर डॉ. जयंत नारळीकर अशा ऑनलाईन कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन करत. (साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलींद जोशी यांनी सांगितलेली ही ह्द्यस्पर्शी आठवण.)

     

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow